नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ निमित्त शहरात एकाचवेळी हाती घेण्यात आलेल्या विकास कामांमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. खोदलेले रस्ते, पर्यायी मार्गाने वळवलेली वाहतूक यामुळे नागरिकांमधून रोष प्रगट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेतली. कामात समन्वयाचा अभाव, नियोजनातील त्रुटी आणि सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली स्थिती मांडली.

काही महिन्यांपासून नाशिकची अवस्था मोहंजोदारोसारखी झाली आहे. कुंभमेळ्यासाठी शहरातील प्रमुख २९ मार्गांचे काम एकाचवेळी हाती घेण्यात आले. त्याचवेळी द्वारका चौकात भुयारी मार्गिकेचे काम सुरू आहे. लहान-मोठे रस्ते आणि चौकात पावसाळी, भुयारी गटारीची कामे, एमएनजीएल गॅस वाहिनी तसेच इतर कामांसाठी खोदकाम सुरू आहे. कुठलेही नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या कामांमध्ये अनेक त्रुटी असून विकास कामे सुरू करताना आवश्यक माहिती फलक अनेक ठिकाणी लावलेले नाहीत. ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने रस्ते खोदकाम सुरू असल्याची तक्रार करण्यात आली. काँक्रीट रस्ते करताना महावितरणच्या वीज तारा भूमिगत करण्याचा समावेश नसल्यामुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार असल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता भाजप आमदारांनी व्यक्त केली.

गटार, पाणी पुरवठा, एमएनजीएल व अन्य विभागांमध्ये समन्वय नसल्याने एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम होत असल्याची बाब फरादे आणि हिरे यांनी मांडली. काही ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना न केल्यामुळे अपघात होऊन दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते अचानक खोदल्यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून काम अपूर्ण अवस्थेत अनेक दिवस सोडून दिले जाते. काही ठिकाणी केवळ ठराविक वेळेतच काम केले जाते. त्यामुळे खोदकाम चोवीस तास पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी आमदारांनी केली.

पर्यायी रस्त्यांची व्यवस्था न करता रस्ते बंद केले जात असल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खड्डे भरताना योग्य तांत्रिक पद्धतींचे पालन न करता केवळ माती टाकल्यामुळे पावसाळ्यात रस्ते पुन्हा खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबींमुळे नागरिकांचा रोष लोकप्रतिनिधींवर व्यक्त होत असून, मनपा प्रशासनाकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

आठ दिवसांत सुधारणा

या सर्व समस्या लक्षात घेऊन आठ दिवसांत आवश्यक सुधारणा करून सविस्तर सादरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले. तसेच, संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून कामे अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती भाजप आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी दिली.