नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्यातील महिला बचत गट, एकल महिला यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पूजा साहित्यासह विविध प्रकारच्या भेटवस्तु तयार करण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात तीनपेक्षा अधिक पर्वणी आहेत. या पर्वण्यांमध्ये स्नानासाठी देश, विदेशातून भाविक, पर्यटक येणार आहेत. गोदावरीत अमृत स्नानानंतर दीप दानासाठी अनेकांचा आग्रह असतो. तसेच अन्य धार्मिक विधी गोदातीरी होत असतात. याशिवाय नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदा आरती होणार असून यासाठी लागणारी पूजेची थाळी आकर्षक पध्दतीने तयार करण्याचे काम पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर येथील बचत गटांना देण्यात आले आहे. यामध्ये पूजेचे कुंकू, हळद,कापूर, पंचगव्य, कापसाच्या वाती हे सर्व महिला करणार आहेत. ही थाळी लहान तसेच मोठ्या आकारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने येतील. याशिवाय अतीमहत्वाच्या व्यक्ती येणार आहेत. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करत असताना त्यांना बांबुच्या भेटवस्तु देण्याचे नियोजन आहे. यासाठी हरसूर परिसरात एक समूह केंद्र (क्लस्टर) उभारणी करण्यात येत असून बचत गटातील महिलांना बांबुपासून आकर्षक शोभेच्या वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कुंभ पर्वणी पावसाळ्यात असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना छत्री, रेनकोट यासह वेगवेगळ्या वस्तु देण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. प्रदुषण टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला असून कापडी पिशव्या तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. कुंभपर्वात महिलांनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तु, खाद्यपदार्थ, नैसर्गिक उत्पादन यांचे नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. आदिवासी महिलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील नऊ हजाराहून अधिक बचत गट या उपक्रमात सहभागी होत असून या माध्यमातून १० हजांराहून अधिक महिलांना रोजगार मिळणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा जगभरातील भाविकांसाठी एक धार्मिक उत्सव असला तरी यानिमित्त जिल्ह्यातील महिलांना काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत आहे. महिला बचत गटांना कुंभमेळ्यासंबंधित काही कामे देण्यात येत आहेत. विशेषत: धार्मिक विधींसाठी लागणारे साहित्य तयार करण्याचे काम महिलांना मिळणार आहे.
