नाशिक – ‘मंदिरांचे शहर’ अशी नाशिकची ओळख. गोदावरी काठावर भटकंती केल्यानंतर याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. या परिसरात शेकडो मंदिरे आहेत. यातील एक म्हणजे सिंहस्थ श्री गंगा गोदावरी मंदिर, ज्याचे थेट सिंहस्थ कुंभमेळ्याशी नाते आहे. दर १२ वर्षांनी गोदा काठावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो, केवळ त्याच काळात हे मंदिर दर्शनासाठी उघडते. कुंभपर्व संपल्यानंतर पुन्हा ते बंद केले जाते.

कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबरला दुपारी होणार आहे. या मुहूर्तावर सिंहस्थ श्री गंगा गोदावरी मंदिर साधू-महंतांच्या हस्ते जलाभिषेक आणि ध्वजारोहणाने भाविकांसाठी खुले होईल. रामतीर्थ अर्थात रामकुंडाच्या उत्तरेस हे मंदिर आहे. सुमारे ७०० वर्षांची परंपरा लाभलेले भारतातील हे एकमेव मंदिर मानले जाते. गंगा आणि गोदावरीच्या मूर्तीस्थित असलेले हे दगडी मंदिर आहे. गौतम ऋषी, गंगा आणि गोदावरी यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी गौतम ऋषींची मूर्ती उघड्यावर (ऊन-पावसात) होती. इ. स. १७७५ मध्ये गोपिकाबाईंनी या ठिकाणी सभा मंडप उभारून दिल्याने मूर्तींचे संरक्षण झाल्याची माहिती मंदिराचे पूजारी कमलाकर जोशी देतात.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण रामकुंड परिसराचा चेहरामोहरा बदलत आहे. यानिमित्ताने या मंदिराच्या फरशा बदलण्यात आल्या. रंगरंगोटी आणि पाणी गळती रोखण्याची कामे पूर्ण करण्यात आली. मंदिरावर ध्वजारोहणासाठी योग्य व्यवस्था आणि खाली-वर जाण्यासाठी लोखंडी जिना, पायऱ्यांची मात्र प्रतिक्षा आहे. कुंभमेळ्यात देशभरातून येणारे साधू-महंत आपापल्या भागातून जल आणून अभिषेक करतील. त्यानंतर ध्वजारोहण होऊन मंदिर भाविकांसाठी खुले होईल. कुंभमेळ्याचा कालावधी वगळता मंदिर बंद असते, परंतु, बाहेरील देवीच्या पादुकांचे पूजन नियमित चालते.

वर्षातून गंगा दशहरा आणि त्रिपुरी पौर्णिमा (देव दिवाळी) या दोन दिवशी पहाटे पाच वाजता पूजा-अर्चा आणि उत्सवासाठी मंदिर उघडून रात्री १२ वाजता बंद केले जाते, असे मंदिराचे पुजारी जोशी यांनी सांगितले. कुंभमेळ्याशी थेट संबंध असणारे हे मंदिर आहे. ध्वजारोहणाचा मुख्य स्तंभ या मंदिराशेजारी उभारण्याचा आग्रह धरण्यात आला होता. परंतु,, तसे झाले नाही. शेकडो वर्षांपासून गोदावरीच्या पुराची अनुभूती हे मंदिर घेत आहे. गाभाऱ्याची रचना अशी आहे की, नदीचे पाणी कितीही दिवस राहिले तरी मूर्तीची झीज वा अन्य काही नुकसान होत नाही, असा दाखला पुजारी देतात.

दिशादर्शक फलकांची गरज

रामकुंड परिसरात गंगा गोदावरी नावाशी साधर्म्य साधणारी आणखी काही मंदिरे आहेत. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांचा संभ्रम होतो. या परिसरात रामकुंडाजवळ अरूणा संगमावर श्री गंगा गोदावरी पंचकोटी मंदिर आहे. तर प्राचीन गोदावरी मंदिर आहे. ही मंदिरे भाविकांना दर्शनासाठी वर्षभर खुली असतात. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, भाविकांचा संभ्रम टाळण्यासाठी कुंभमेळ्यात खुल्या होणाऱ्या सिंहस्थ गंगा गोदावरी मंदिरासाठी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.