नाशिक – पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक येतील. यापैकी अनेक भाविक सप्तशृंग गडासह परिसरातील विविध धार्मिक व आध्यात्मिक स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ मुख्य कुंभक्षेत्राचा विचार न करता परिसरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी समन्वय साधून सर्वंकष नियोजन कुंभमेळा प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. स्थानिक प्रशासनाला गर्दी व्यवस्थापनाचा अनुभव असला तरी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य वाढीव गर्दीचा विचार करून अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून ठेवावी.
गडाची भौगोलिक रचना, रस्ते, वाहनांची वाहतूक, वाहनतळ तसेच भाविकांची सुरक्षित आणि सुरळीत ये-जा यांचे स्वतंत्र नियोजन करण्याविषयी सूचना नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या. कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने सप्तशृंग गड (ता. कळवण) येथे कुंभमेळा २०२७ पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, उपवनसंरक्षक राकेश सेपट, ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, नियोजन उपायुक्त योगेंद्र चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तहसीलदार रोहिदास वारुळे आदी उपस्थित होते.
स्वच्छता, कचरा व्यवस्थापनावर भर
या कालावधीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन सध्याच्या कचरा निर्मितीचा बेसलाइन डेटा तयार करावा. त्यानुसार अतिरिक्त मनुष्यबळ, डस्टबिन, कचरा संकलनासाठी वाहने, तात्पुरती साठवणूक व्यवस्था आणि कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यांचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार तात्पुरती कचरा प्रक्रिया व्यवस्था उभारण्याची शक्यता तपासावी. निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्यापासून अगरबत्ती, धूपबत्ती यांसारखी उत्पादने तयार करणाऱ्या संस्था किंवा स्टार्टअप्सशी समन्वय साधावा.
ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सामाजिक दायित्व निधीतून किंवा इतर उपलब्ध निधीतून आर्थिक स्रोत उभारण्याची शक्यता तपासावी, असेही शेखर सिंह यांनी सांगितले. कुंभमेळ्यातील अपेक्षित गर्दीचा मागील अनुभव व आकडेवारीच्या आधारे वास्तववादी नियोजन करावे. भाविकांना सुरक्षिततेसोबत चांगला व आध्यात्मिक अनुभव मिळेल, यावर विशेष भर द्यावा. बसस्थानक, शटल सेवा आणि खासगी वाहनांसाठी पार्किंगची योग्य व्यवस्था करावी. अग्निशमन दल, रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करावेत. वणी, नांदुरी व गड परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार तात्पुरती व मोबाईल स्वच्छतागृहे उभारावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पायाभूत सुविधांसाठी नऊ कामे प्रस्तावित
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गड परिसरातील पायाभूत सुविधांसाठी ९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार म्हणाले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग गड येथे जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना पंचायत समिती स्तरावर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
न्या. सोनुने यांनी सांगितले की, ट्रस्टच्या स्तरावर गडावर प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे. नांदूरी येथे सुरू असलेल्या नियमित आरोग्य व्यवस्थेच्या धर्तीवर ही सुविधा विकसित करता येईल. कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने संभाव्य आरोग्यविषयक परिस्थितीचा विचार करून ही व्यवस्था आवश्यक आहे. पुढील दोन वर्षांत यासाठी नियोजन करता येईल. सहायक जिल्हाधिकारी डॉ. संख्ये, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या नियोजनाची माहिती दिली.
