नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या दिवशी गोदा महाआरती सोहळ्यात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. नगरसेवकांनी कुंभमेळा आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांना धारेवर धरले. भाजपचे आमदार पहिल्या रांगेत, तर नाशिकच्या खासदारांना चौथ्या रांगेत स्थान दिल्याचा आक्षेप घेण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळा नाशिककरांचा आहे की एका पक्षाचा, असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे गटाने विरोधी पक्षाच्या प्रभागांमध्ये सजावट किंवा भगवे झेंडे लावले नसल्याची तक्रार करीत प्रशासनावर ताशेरे ओढले. मात्र, आसन व्यवस्थेबाबतचे आक्षेप कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी फेटाळले.
गोदाकाठी शनिवारी पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्यातील मानापमान नाट्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. भाजप नगरसेवकांपाठोपाठ आता विरोधी शिवसेना ठाकरे गटानेही आसन व्यवस्था आणि नियोजनावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेतील गटनेते केशव पोरजे आणि नगरसेवक सोमवारी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकले. प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा देत त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांना जाब विचारला. प्रशासनाने रामकुंडावर सकाळी नगरसेवकांची चेष्टा केली. संध्याकाळी खासदारांना चौथ्या रांगेत बसवले. पहिल्या रांगेत भाजपचे आमदार बसले होते. मग खासदारांना मागे का स्थान दिले, असा प्रश्न उपस्थित करीत खासदारांचा सन्मान राखला नसल्याचा आरोप करण्यात आला. कुंभमेळ्याच्या बैठकांपासूनही त्यांना दूर ठेवले, असेही सांगण्यात आले. प्रशासनाने नाशिकरोडप्रमाणेच विरोधी पक्षाच्या प्रभागांमध्ये सजावट केली नाही. साधे भगवे झेंडेही लावले नाहीत, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.
यावर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्टीकरण देत आंदोलकांचे आक्षेप खोडून काढले. १५ मंत्र्यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले होते. प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावरील पहिल्या दोन रांगा त्यांच्यासाठी राखीव होत्या. त्यानंतरच्या रांगेत खासदार, आमदार आणि पुढे वरिष्ठ अधिकारी, अशी आसन व्यवस्था होती. खासदार वाजे हे सुरुवातीला येऊन आपल्या खुर्चीवर बसले. नंतर मागील काही जण पुढे आले. कुंभमेळ्याच्या बैठकांना प्रोटोकॉलनुसार खासदार वाजे यांच्यासह भास्कर भगरे आणि डॉ. शोभा बच्छाव यांना निमंत्रित केले जाते. निमंत्रण पत्रिकेतही त्याचे पालन करण्यात आले असून, पुढेही तसेच होईल, असा दावा त्यांनी केला. खासदार वाजे यांच्याशी आपण चर्चा केली. संपूर्ण वस्तुस्थिती मांडून आपली काही चूक नव्हती, हे स्पष्ट केले. तरीही आपण दिलगिरी व्यक्त केल्याचे सिंह यांनी आंदोलकांना सांगितले.
कुणाही लोकप्रतिनिधीचा अवमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावरील आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. नंतर काही मंत्री आले नाहीत. त्यामुळे आसन व्यवस्थेत मागे-पुढे झाले आणि संभ्रम निर्माण झाला. त्याबाबतची स्पष्टता करण्यात आली. आम्ही जी मांडणी केली, ती प्रोटोकॉलनुसारच केली होती. पुढेही तसेच होईल. शेखर सिंह (कुंभमेळा आयुक्त, नाशिक)
