नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांना दर्जेदार, तत्पर व अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये, वैद्यकीय संघटना आणि सेवाभावी संस्थांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. आरोग्य पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर होण्यासाठी सर्व संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणांच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कपिल आहेर, एमपीजीआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. व्यंकट गिते, एसएमबीटी महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, आयएमएच्या सचिव डॉ. मनीषा जगताप यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य पायाभूत सुविधांची माहिती जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय संघटना व आरोग्य संस्थांना देण्यात यावी. त्यांच्याकडून सूचना आणि अभिप्राय घेऊन आवश्यक त्या सुधारणा केल्यास आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, असे डाॅ. गेडाम यांनी सांगितले. भाविकांना उपचारासाठी रुग्णालय सहज उपलब्ध व्हावे यासाठी आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या रुग्णालयांचे मॅपिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक रुग्णालयातील उपलब्ध खाटांची अद्ययावत माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध ठेवावी. संभाव्य साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच विविध आरोग्य संस्था व सेवाभावी संघटनांनी स्वयंप्रेरणेने सहभागी होऊन आरोग्य सेवेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी पर्वणीच्या काळात स्थानिक नागरिकांनाही वेळेवर आरोग्य सेवा मिळेल, यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सिंहस्थ काळात जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा सहभाग निश्चित करण्यासाठी शासनाने तीन पर्याय निश्चित केल्याची माहिती दिली. पहिल्या पर्यायात सार्वजनिक आरोग्य सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील, तर संबंधित रुग्णालयांकडून मनुष्यबळ, औषधे व सेवा पुरविण्यात येतील. दुसऱ्या पर्यायात खासगी रुग्णालये त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी भाविकांना सेवा देतील. तिसऱ्या पर्यायात डॉक्टर आपल्या नियमित सेवेसह कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त आरोग्य सेवा देतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनीही मार्गदर्शक सूचना केल्या.