नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी ३१ ऑक्टोबर रोजी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या ध्वजारोहणाने होणार आहे. ध्वजारोहण सोहळा अवघा दोन दिवसांवर आला असतानाही नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी कुंभमेळ्याची अनेक कामे अपूर्ण आहेत. त्याविषयी स्थानिक नागरिकांमध्ये आधीच नाराजी असताना आता अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत संजयदास महाराज यांनीही कुंभमेळ्याची संथ कामे आणि नियोजनात असलेल्या त्रुटींवर बोट ठेवले आहे. प्रशासनाविरुध्द उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक येथे आल्यानंतर महंत संजयदास यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबधित वेगवेगळ्या विषयांवर महंत संजयदास यांनी मत व्यक्त केले. सिंहस्थ कुंभमेळा जवळ आला असतानाही अनेक विकासकामे अर्धवट आहेत. साधूग्राम तसेच अनेक कामे संथपणे होत आहेत. साधूग्रामसाठी भूसंपादन रखडले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात ‘साधुग्राम’ला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. असे असताना प्रशासनाकडून साधूंसाठी भूखंड आखणी करून जागा सोपविण्याचे कामही पूर्ण करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना पूर्वीचा मोबदलाही मिळालेला नसल्याचे सांगण्यात येते नाशिक महापालिकेने शेतकऱ्यांचे पैसे त्वरीत देण्याची गरज आहे. तसे न केल्यास साधू शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. पंचवटीतील तपोवन परिसरात आखाडे आपल्या छावण्यांची उभारणी करतात. त्याठिकाणी प्रशासनाकडून वृक्षारोपण करण्यात आले आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासारखा सनातन धर्माचा जागतिक सोहळा होऊ नये म्हणून काही जण न्यायालयात गेले असून जाणीवपूर्वक खोडा घालत असल्याची नाराजी महंत संजयदास यांनी व्यक्त केली.

गोदावरीतील जल प्रदूषणाविषयीही महंत संजयदास यांनी चिंता व्यक्त केली. गोदावरीत कोट्यवधी भाविक स्नानासाठी येतात. त्यामुळे गोदावरी स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नाशिक येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यात गोदा आरतीही होणार आहे. या गोदा आरतीसाठी शैव आणि वैष्णव दोन्ही पंथाचे साधू एकत्र येणार असल्याबद्दल महंत संजय दास यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, सत्ताधारी भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी कुंभमेळा हा हिंदूंचा असल्याने मुस्लिमांनी कुंभमेळ्यात सहभाग घेऊ नये तसेच भाविकांनीही मुस्लिम दुकानदारांकडून साहित्य खरेदी करू नये, असे वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात, महंत संजयदास यांनी राणे यांच्या वक्तव्याशी असहमती व्यक्त केली. हिंदू भाविकांबरोबरच मुस्लिम आणि अन्य धर्मीय नागरिक शुद्ध मनाने कुंभमेळ्यात सहभागी होऊ शकतात, असे मत मांडले. महंत संजयदास यांनी सिंहस्थ कामांतील संथपणाबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीनंतर प्रशासनाकडून कामांना गती देण्यात येण्याची शक्यता आहे.