नाशिक – अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात साधू-संतांनी “नशामुक्त कुंभ” ही संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. कुंभमेळा हा देशभरासाठी आदर्श ठरावा आणि युवाशक्तीला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हा संकल्प करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कुंभमेळा अधिक भव्य दिव्य करण्याच्या प्रयत्नात अनावश्यक खर्च टाळावा, असे मतही त्यांनी मांडले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, येथे आयोजित दोन दिवसीय परिषदेला सुरुवात झाली. यात देशभरातील विविध आखाडे, संप्रदायातील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय संत समिती अध्यक्ष सतकैवलाचार्य अविचल देवाचार्य महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत रविंद्रपुरी महाराज, महंत ग्यान देवसिंग महाराज, स्वामी निलेंद्रानन्द सरस्वती, महंत दुर्गादास महाराज आदींसह कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते.

परिषदेत हिंदू धर्माची एकता, परंपरा आणि जागतिक स्तरावर त्याचा प्रसार यावर चर्चा करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे माधव महाराज राठी यांनी साधू संतांच्या सूचनांचे निवेदन केले. नशामुक्त कुंभ उपक्रमाला मंत्री महाजन यांनी सहमती दर्शवली.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा मांडला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी संत-महंतांनी विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, कुंभमेळा अधिक भव्य करण्याच्या प्रयत्नात अनावश्यक खर्च टाळावा, असा सल्लाही दिला. आखाडे आणि साधू-संतांच्या सोई सुविधा कामांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.

तीर्थाटन संकल्पना पुढे नेण्यावर भर…

नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्राचीन मंदिरांचा जिर्णोद्धार करून पर्यटन नव्हे तर ‘तीर्थाटन’ ही संकल्पना पुढे नेण्यावर भर देण्यात आला. संतांच्या या सूचनांची शासनाकडून दखल घेतली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. या परिषदेत १३ आखाडे, १२७ संप्रदाय आणि १५९ उपसंप्रदाय सहभागी झाले आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील संत समितीच्या राष्ट्रीय बैठकीस उपस्थित राहून देशभरातील साधू-महंतांशी संवाद साधणार आहेत.