नाशिक – २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती सुमारे ६६ किलोमीटरचा रिंगरोड (परिक्रमा मार्ग) तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पात नाशिक शहर परिसरातील काही खेड्यांचा समावेश आहे. रिंगरोडमुळे नाशिकजवळील खेड्यांचा विकास होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी रिंगरोडचे काम सुरु होण्याआधीच अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. ठिकठिकाणच्या स्थानिकांकडून रिंगरोडला विरोध करण्यात येत असल्याने प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत.

रिंगरोड प्रकल्पात जमीन गेल्यावर नेमका किती मोबदला मिळेल, तो कधी मिळेल, याविषयी अजूनही बाधितांच्या मनात शंकात आहेत. त्याचे दर्शन त्यांच्या विरोधामधून वेळोवेळी होत आहे. शेतकऱ्यांची जमीन, गुंठेवारीतील घरे यांचे संपादन करण्यात येणार आहे. परंतु, या प्रकरणात अन्याय होत असल्याची भावना बाधितांमध्ये आहे. त्यामुळेच न्याय न मिळाल्यास नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्यांनी दिला आहे. नुकतीच विहितगाव येथे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी आणि रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीचे आयोजन नगरसेवक केशव पोरजे, योगेश गाडेकर, संजीवनी हांडोरे यांनी केले होते. यावेळी प्रांत अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रकल्प बाधितांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या. जमीनमालकांनी सर्व जमिनींचे एकच मूल्यांकन ठेवण्याची मागणी केली. गुंठेवारीने विकलेल्या जमिनीवर ज्यांनी घरे बांधली, त्यांना मोबदला मिळावा. तसेच ज्या इमारतींमधील सदनिका जाणार आहेत, त्या सदनिका मालकांनी मोबदल्याऐवजी सदनिकाच देण्याची मागणी केली.

दरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी रिंगरोडमध्ये जमीन, घर, भूखंड जाणाऱ्या एकावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. पुढील बैठक जिल्हाधिकाऱ्यांबरोबर घेण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. याआधी एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा परिसरातही रिंगरोड बाधितांबरोबर खासदार वाजे यांनी बैठक घेतली होती. रिंगरोडसाठी काही नागरिकांच्या निवासी आणि व्यावसायिक जागा संपादित करण्यात येणार असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

रिंगरोडकरिता जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक मोबदल्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. बाजारभावापेक्षा पाचपटीने अधिक दर मिळाला तरच भूसंपादनाविषयी चर्चा करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सिंहस्थ परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोडसाठी भूसंपादन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. दरम्यान, रिंगरोडमध्ये जमीन जाणाऱ्या नाशिक रोडजवळील एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा परिसरातील नागरिकांनी ‘अरिंगळे मळा बचाव समिती’ स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार वाजे यांनी नागरिकांना दिलासा दिला.