नाशिक – सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ग्रामस्थांना मातीतल्या एका विशेष जिवाणूमुळे तब्बल ६७ लाखांचा नफा मिळवून दिला आहे. बॅसिलस कोअग्युलन्स असे या जिवाणूचे नाव आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीतील ॲडव्हान्सड एन्झाइम टेक्नॉलॉजी या कंपनीने व्यावसायिक वापरासाठी दापूरच्या मातीतून जैविक संसाधन प्राप्त केले. आणि त्यामुळेच दापूरच्या ग्रामस्थांना फायदा झाला.

वन विभागाच्या विविध समित्या आहेत. याअंतर्गत ग्रामपातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समिती काम करते. ही समिती आपल्या परिसरातील जैवविविधतेची नोंद ठेवते. यामध्ये पशु, पक्षी, वृक्ष, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आदींची माहिती संकलित केली जाते. या जैवसंपदेचा व्यावसायिक कामासाठी वापर होत असेल तर जैवविविधता कायदा २००२ मधील तरतुदीनुसार वनविभागाच्या त्या संबंधित भागात प्रवेश आणि लाभ वाटप या तरतुदीनुसार नफा जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करावा, असा निकष आहे.

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील ॲडव्हान्सड एन्झाइम टेक्नॉलॉजी या कंपनीने व्यावसायिक वापरासाठी दापूरच्या मातीतून जैविक संसाधन प्राप्त केले होते. जैवविविधता कायद्याच्या अनुषंगाने या संसाधनाच्या वापरामुळे तयार करण्यात आलेले उत्पादन, त्याच्या विक्रीतून झालेला नफा यातील ठरलेला हिस्सा कंपनीने राष्ट्रीय पातळीवरील वन विभागाच्या नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी ऑफ चेन्नईकडे जमा केला.

प्राधिकरणाने ती रक्कम आता दापूरच्या जैवविविधता समितीकडे वर्ग केली आहे. या रकमेचा धनादेश दापूर ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ग्रामपातळीवरील वन समितीकडे सुपूर्द करण्यात आला.वनविभागाची जैवविविधता समिती आपल्या परिसरातील वनसंपदेची माहिती संकलित करत असते. जैवविविधतेचा वापर हा आैषध, रसायन वा अन्य कामासाठी होतो. मात्र हे करतांना जैवविविधता कायद्यानुसार उत्पादन तयार करणाऱ्या कंपनींना त्यांना त्यांच्या उत्पादनात कुठले घटक, कुठून घेतले याची माहिती द्यावी लागते.

या निकषाच्या आधारे सिन्नर तालुक्यातील दापूर परिसरातील जागेतुन जिवाणू घेतला असल्याचे स्पष्ट केले. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर माहिती दिल्यानंतर उत्पादनासाठी घटक वापरण्याची परवानगी देण्यात आली. कंपनीच्या एकूण उत्पादनाच्या किती टक्के भाग दिला जाईल, हे ठरले. हा नफा राष्ट्रीय जैवविविधताकडे त्यानुसार वर्ग केला गेला. दापूरसह साताऱ्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी, पुण्यातील कुंजीरवाडी या गावांचीही या जिवाणुसाठी निवड झाली आहे. – रविकांत डेंगरे (सहायक वनसंरक्षक, सिन्नर तथा प्रभारी महाराष्ट्र स्टेट बायोडायवरसिटी बोर्ड)

बॅसिलस कोअग्युलन्सचे काम काय ?

बॅसिलस कोअग्युलन्स जिवाणू हा अतिसार कमी करण्यास मदत करतो. इरिटेबल बोवेल सिंड्रोममध्ये आराम देतो. गॅस, अपचन कमी करण्यासाठी मदत करतो. रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय अन्न व औषध उद्योगात लॅक्टिक ॲसिड तयार करण्यासाठी, काही एन्झाइम्स तयार करण्यासाठी, पशुखाद्यात पचन सुधारण्यासाठी होतो.