नाशिक – सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील जगदंबा माता सहकारी पतसंस्थेत अशोक खरातने ३२ बनावट खाती उघडून नऊ वर्षात कोट्यवधींची उलाढाल केली. महत्वाची बाब म्हणजे, यातील दोन खाती मृत व्यक्तींच्या नावे आहेत. बनावट खात्यांतील उलाढालीकडे दुर्लक्ष आणि पतसंस्थेच्या अध्यक्षपदाचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात सिन्नर न्यायालयाने पतसंस्थेचा संस्थापक आणि सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचा (स्टाईस) अध्यक्ष नामकर्ण आवारेला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या गुन्ह्यात आदल्या दिवशी अशोक खरातला पोलीस कोठडी झाली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नामकर्ण आवारेला न्यायालयात हजर केले. खरात आणि आवारे प्रदीर्घ काळापासून परिचित होते. खरातने मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानच्या कार्यकारी मंडळात सरचिटणीसपदी आवारेची नियुक्ती केली. तर आवारे संस्थापक असणाऱ्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खरातची नियुक्ती झाली होती. सिन्नर न्यायालयात सरकारी वकील जगदीश पाटील यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. पतसंस्थेत आवारे अध्यक्ष असताना खरातने ३२ बनावट खाती उघडली. पतसंस्था मोठी करावयाची असल्याचे सांगत आवारेने व्यवस्थापकाला बनावट खात्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी दबाव टाकला. ही खाती उघडताना संबंधितांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, दोन छायाचित्र आणि साक्षीदार घेऊन अर्ज भरून केवायसी देखील केली गेली नाही. २०१६ ते २०२३ या कालावधीत या खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले. अशा अनेक बाबींची चौकशी करण्यासाठी आवारेला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

बचाव पक्षाचे वकील आर. जे. कासलीवाल यांनी त्यास विरोध केला. संशयित आवारे ६५ वर्षांचे असून त्यांना हृदयाचा आजार आहे. सिन्नर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती असून स्टाईसचे अध्यक्ष आहेत. आजपर्यंत त्यांनी पोलिसांना सहकार्य केले असून कागदपत्रे जप्त झाली असल्याने पोलीस कोठडी देण्याची गरज नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने संशयित नामकर्ण आवारेची १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

उलाढालीतून अर्थार्जन

अशोक खरातने पतसंस्थेचा अध्यक्ष नामकर्ण आवारे याच्या माध्यमातून ३२ बनावट खाती उघडली होती. या खात्यातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारातील दोन टक्के रक्कम खरात हा आवारेला देत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असणारा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याच्या जबाबात धक्कादायक बाबी समोर आल्या. आवारेच्या सांगण्यावरून खरातने दिलेल्या यादीनुसार बनावट खाती उघडली गेली. पतसंस्थेतील व्यवहारांबाबत तो सर्व माहिती अध्यक्ष आवारेला देत होता. बनावट खात्याची कुठलीही कागदपत्रे, अर्ज देखील भरून घेतली नसल्याबाबत वारंवार कल्पना दिल्यानंतरही आवारेने आपल्याला पतसंस्था मोठी करायची असून त्याकडे लक्ष न देण्याची सूचना केली होती, असे कांडेकरचे म्हणणे आहे.

एकाचवेळी पाच ते नऊ लाख रुपयांची देवाणघेवाण

पतसंस्थेतील ३२ बनावट खात्यांमध्ये एकाच महिन्यात दीड कोटी रुपये जमा झाले होते. इतकी रक्कम कशा पद्धतीने पतसंस्थेत जमा झाली, याची अध्यक्ष व संचालक मंडळाने खात्री करून कार्यवाही करणे गरजेचे होते. त्याकडे नामकर्ण आवारेने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे तपासात निष्पन्न झाले. एकावेळी एका व्यक्तीस पतसंस्थेतून दोन लाख रुपये काढता येतात. त्याहून अधिक रक्कम असेल तर अर्ज व पॅनकार्ड देणे बंधनकारक असतानाही संशयिताने बनावट खात्यांमधून एकाचवेळी पाच ते नऊ लाख रुपये काढल्याचे पावत्यांवरून उघड झाले आहे.