नाशिक – राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारातून देवपूरसाठी निघालेल्या बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने बस थेट फलाटावर चढली. या अपघातात सिन्नर तालुक्यातील दापूर येथील नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. मुलाची आई आणि अन्य काही प्रवासी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.

सिन्नर आगाराची बस देवपूरसाठी सकाळी ११ वाजता सुटणार होती. सकाळी १०.४५ वाजता चालक आगारातून बस फलाटावर लावत असतांना अचानक बसचे ब्रेक नादुरुस्त झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसची वेळ झाल्याने काही प्रवासी त्या फलाटावर येऊन थांबले होते. बस येतांना दिसताच बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली.

ब्रेक नादुरुस्त झालेली बस थेट फलाटावर चढली. गौरी बोऱ्हाडे (३०) आणि त्यांचा मुलगा आदर्श (नऊ) , विठाबाई भालेराव, ज्ञानेश्वर भालेराव (रा. तामकटवाडी) यांच्यासह काही प्रवासी फलाटावर उभे होते. बसची धडक बसल्याने आदर्शला गंभीर दुखापत झाली. गौरी, विठाबाई, ज्ञानेश्वर हेही जखमी झाले. जखमींना तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले. रस्त्यातच आदर्शचा मृत्यू झाला.

या अपघातामुळे स्थानकात गोंधळ उडाला. पोलिसांनी बस स्थानक गाठत चालकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. संतप्त नागरिकांनी भाजपचे उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णवाहिका जाऊ देण्याची विनंती जमावाला केली. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मृताच्या वारसास १० लाख रुपयांची मदत तर जखमींचा उपचाराचा खर्च करण्यात येणार आहे.

सिन्नर स्थानकाचा ढिम्म कारभार

सिन्नर बस स्थानकातून सिन्नर- देवपूर रस्त्यावर प्रवासासाठी विठाई बस बुधवारी सकाळी स्थानकात लावली जात असताना ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालक थेट ब्रेकवर उभा राहिला. बस फलाटावर चढत असतांना काही प्रवासी दूर झाले, काहींना पळता आले नाही.

बस खांबावर आदळत पुन्हा बाजूला वळली. त्यावेळी चार जण त्या धडकेत सापडले. यामध्ये आदर्शला चेहरा आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. अन्य काही जण जखमी झाले. हा गोंधळ सुरू असतांना स्थानक प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळावर आला नाही. नागरिकांनी रोष व्यक्त करत नादुरूस्त बस रस्त्यावर उतरते कशी, असा प्रश्न उपस्थित केला.