नाशिक : शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंतच्या नदीकाठावर २३ ठिकाणी ५५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतले आहे. जोडीला नदीकिनारी ५३ ध्वनिक्षेपक बसविले जाणार आहेत. जेणेकरून पूरस्थिती वा आपत्कालीन काळात काठावरील नागरिकांना सावध करणे दृष्टीपथास येणार आहे.

गोदावरीची उपनदी असणाऱ्या नंदिनीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. वाळू उपसा होतो. परिसरात मद्यपी व गुन्हेगारांचा वावर असतो. नंदिनीतील प्रदूषणाचा परिणाम पुढे गोदावरी नदीवर होतो. नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, यासाठी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. फाउंडेशनने हा विषय प्रारंभी महापालिकेसमोर मांडला होता. मनपा आयुक्तांनी मार्च २०२२ मध्ये तो स्मार्ट सिटीकडे पाठविला. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत त्यास अंतिम मंजुरी मिळाली.

हेही वाचा…परम संगणक निर्मितीला किती खर्च आला ? विद्यार्थ्यांची जिज्ञासा अन् डॉ. विजय भटकर यांचे हितगूज

नंदिनी काठालगतच्या सिटी सेंटर मॉलची मागची बाजू, महालक्ष्मी मंदिर, म्हसोबा महाराज मंदिर, दोंदे पूल, बाजीरावनगर, मिलिंदनगर, उंटवाडी, छत्रपती संभाजी महाराज चौक, सिटी सेंटर मॉल चौकातील पूल, गोविंदनगर, मुंबई नाक्यापर्यंत अशा एकूण २३ ठिकाणी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यात अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा समावेश आहे. पूर परिस्थितीसह आपत्कालीन काळात नागरिकांना सावध करता यावे, यासाठी ५३ ध्वनिक्षेपक बसविण्यात येत आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्याला मदत होईल. प्रदूषण रोखण्यासाठी नदीकिनारी सीसी टीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करणे हा राज्यातील पथदर्शी प्रकल्प ठरणार असल्याची स्थानिकांची भावना आहे.

हेही वाचा…दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले; भाजपच्या माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्त्याची हत्या

गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण रोखणे, जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी नंदिनी नदीकिनारी सीसीटीव्ही यंत्रणेचा हा पथदर्शी प्रकल्प नाशिक शहरात सर्व ठिकाणी अंमलात आणला जावा. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीतही याची मदत होईल. -चारुशीला गायकवाड (देशमुख)