नाशिक – २०२६ हे नवीन वर्ष नाशिकसाठी दळणवळण सुविधा घेऊन येणारे ठरत असल्याचे दिसत आहे. २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिसरातून जाणारा रिंगरोड प्रकल्प असो, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण असो, नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांची दुरुस्ती असो, अशी अनेक कामे यावर्षी होणार आहेत. त्यातच ३१ डिसेंबर २०२५ रोजी मंजूर करण्यात आलेल्या नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गासंदर्भातही नाशिककरांसाठी आनंदवार्ता आहे.

या महामार्गासंदर्भात लोकसभेत २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत विशेष माहिती देण्यात आली. नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक मार्गाचे, रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे. नवीन मार्ग आखले जात आहेत.

नाशिक शहरातून जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्ग एकमेकांना ज्या ठिकाणी छेद देतात, त्या व्दारका चौकातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून या चौकात भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरच नाशिक ते ओझर दरम्यान असलेल्या दहावा मैल या चौफुलीच्या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात येत आहे. सोग्रस ते सटाणा दरम्यान असलेला घाटमार्ग रुंदीकरण करण्यात येत आहे. दुसरीकडे, कोपरगाव ते मालेगाव हा येवलामार्गे जाणारा मार्ग रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. अशी अनेक कामे नाशिक जिल्ह्यात होत आहेत.

त्यातच ‘पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ या योजने अंतर्गत नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. नाशिकहून सोलापूरला जाणाऱ्या आणि सोलापूरहून नाशिकला येणाऱ्यांसाठी हा महामार्ग म्हणजे एक वरदान ठरणार आहे. हाच महामार्ग सोलापूरच्यापुढे आंध्र प्रदेशलाही जोडला जाणार आहे. त्यामुळे नाशिकहून दक्षिण भारतात जाणाऱ्यांसाठी सोय होणार आहे.

हा महामार्ग वाढवण बंदराजवळ दिल्ली-मुंबई जलद मार्गाला जोडण्यासंदर्भातही प्रस्ताव आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यात मुंबई- नागपूर या समृद्धी महामार्गालाही नाशिक-अक्कलकोट महामार्ग जोडण्यात येणार आहे. नव्याने तयार होणारा नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग सहा पदरी राहणार आहे. या महामार्गमुळे सोलापूरसह अक्कलकोटला जाणे कमी वेळेचे होणार आहे.

हा महामार्ग नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणार आहे. नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग अवाढव्य खर्चाचा आहे. अंदाजे एकूण १९, १४२ कोटींचा खर्च या महामार्गासाठी येण्याची शक्यता आहे. महामार्गाची लांबी ३७४ किलोमीटर आहे. या महामार्गमुळे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.

या महामार्गामुळे सुरत आणि चेन्नई या दोन मोठ्या शहरांदरम्यान होणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूकीचा वेळ सुमारे १४ तासांनी कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे अंदाजे २०१ किलोमीटर अंतराची बचत होईल.

नाशिक-अक्कलकोट या दोन शहरादरम्यानचा प्रवासाचा वेळ या महामार्गामुळे सुमारे चार तासांनी कमी होऊ शकेल. याचाच अर्थ, सुमारे ५१ किलोमीटर अंतराची बचत होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पाचे काम सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. या महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नाशिक-अक्कलकोट महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सुरत-चेन्नई महामार्गाचा भाग आहे. गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश सारख्या राज्यांनाही हा मार्ग जोडणार आहे.

नाशिकच्या आडगावजवळ हा महामार्ग मुंबई-आग्रा महामार्गाला जोडला जाईल. लोकसभेत २९ जानेवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीपैकी ९० टक्के भूसंपादनासाठी अधिसूचनाही जाहीर करण्यात आली गेलं आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे.