नाशिक – राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेस शुक्रवारपासून सुरुवात झाली. केंद्रावर पालकांनी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी गर्दी केली होती. पहिलाच पेपर सोपा गेल्याचे परीक्षा केंद्रातुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे खुललेले चेहरे सांगून गेले. पहिल्या दिवशी नाशिक विभागात एकाही गैरप्रकाराची नोंद झाली नाही.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. बहुसंख्य केंद्रांवर तशी व्यवस्था झाली. ग्रामीण भागात काही केंद्रावर मात्र तशी व्यवस्था झालेली नाही. कॉपीमुक्त अभियानातंर्गत शिक्षण मंडळाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. विभागात धुळे जिल्ह्यात २९ हजार २४६, जळगाव ५९ हजार ४७८, नंदुरबार २१ हजार २५३ आणि नाशिक जिल्ह्यात ९६ हजार ६३४ इतके परीक्षार्थी आहेत. विभागातील परीक्षार्थींमध्ये एक हजार ५३७ अपंगांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी लेखनिकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोमवारी नियोजित वेळेपेक्षा आधी पालकांनी विद्यार्थ्यांना बरोबर घेत परीक्षा केंद्र गाठले. केंद्रावर पोहचल्या नंतर पालकांनी परीक्षा सुरू असतांना कोणत्या चुका टाळाव्यात, याविषयी सूचना केल्या. परीक्षा संपण्याआधी काही पालकांनी केंद्राच्या बाजुला गर्दी केली. विद्यार्थी बाहेर आल्यानंतर अनेकांचे चेहरे खुलले होते. काहींनी वेळ कमी पडल्याची तक्रार केली. प्रश्नपत्रिका सोपी होती, असे उत्तर अनेकांनी दिले. दहावी परीक्षेत मातृभाषा असलेल्या मराठीच्या परीक्षेस नाशिक विभागातील कोणत्याही जिल्ह्यात कॉपी झाली नाही.

तणावमुक्ततेसाठी विद्यार्थ्यांशी संवाद

विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवर असणारा परीक्षेचा ताण पाहता परीक्षा किंवा त्या संबंधित काही तक्रार, शंका असल्यास विद्यार्थी, पालकांनी किरण बावा (९४२३१८४१४१, ९४२३०२६३०२), अरुण जायभावे (९६५७५०१७७३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.