नाशिक – उन्हाचा तडाखा वाढला असतांनाही शाळांना सुट्या लागल्याने मामाच्या गावाला जाण्यासाठी बस स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. प्रवाशांची सोय करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बससेवेच्या नियोजनासह बसच्या फेऱ्या वाढविण्यावर भर देण्यात आला असला तरी महामंडळाचे नियोजन कागदावरच असल्याचे बस स्थानक परिसरात दिसत आहे. जादा बसफेऱ्यांचा दावा होत असला तरी गर्दीमुळे प्रवाश्यांना बसची वाट पाहणे भाग पडत आहे. दुसरीकडे, राज्य सरकारच्या आपली बस-आपली सेवा अभियानात पहिल्या तीन दिवसात पाच लाखाहून अधिक प्रवाश्यांनी लालपरीला पसंती दिली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आपली बस- आपली सेवा अभियान सुरू आहे. प्रवाश्यांना सेवा सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. सध्या शाळांना सुट्या लागल्या असल्या तरी महाविद्यालयांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. शाळांना सुट्या लागल्याने सहकुटूंब बाहेरगावी जाण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडू लागल्याने शहरातील मध्यवर्ती, निमाणी, ठक्कर बाजार, मुंबई नाका या बस स्थानकांवर गर्दी वाढली आहे. प्रवाश्यांच्या वाढत्या गर्दीचा आपल्यासाठी फायदा करुन घेण्याकरिता खासगी बस चालकांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत.

दुसरीकडे, वाढत्या तापमानामुळे बस स्थानकावर प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच उभे राहण्यासाठी सावली शोधण्याची धडपड करावी लागत आहे. या त्रासातून सुटका होण्यासाठी काहींकडून ऑनलाईन नोंदणीला पसंती दिली जात असतांना ती सेवाही तुडुंब असल्याने ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना ५-६ तास ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.

ठक्कर बाजार (पुणे-मुंबई मार्ग) आणि निमाणी बस स्थानकात धुळे, जळगाव, सटाणा या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गावी जाणाऱ्यांमध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या अधिक आहे. या गर्दीत त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या बस स्थानक दुरूस्ती, स्थानक लगत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अडथळ्यांची शर्यत पार करत स्थानक गाठावे लागत आहे. यामध्ये ज्येष्ठांना गर्दीतून वाट काढत बसमध्ये चढतांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. प्रवाश्यांना या गैरसोयींना तोंड देत मार्गस्थ व्हावे लागत आहे.

अनेक ठिकाणी जादा बसचे नियोजन

विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी माहिती दिली. उन्हाळी सुट्टीच्या अनुषंगाने १५ एप्रिलपासुन नियमित भाड्यात १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. याचा कुठलाही परिणाम प्रवासी संख्येवर झालेला नाही. राज्य सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या आपली बस-आपली सेवा अभियानात नाशिक विभागात आतापर्यंत पाच लाख ७२,६४३ प्रवाश्यांनी अवघ्या दोन दिवसात प्रवास केला. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे दोन लाख ७७, १२७ इतकी आहे. प्रवाश्यांची मागणी लक्षात घेता पुणे, छत्रपती संभाजी नगर, बोरीवली, शिर्डी, सप्तश्रृंगी गड, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, पाचाेरा, जळगाव या ठिकाणांसाठी जादा बससेवा सुरू आहे.