नाशिक – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर शहरात होणारी गर्दी लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाने ११ सप्टेंबरपासून शहरातील वेगवेगळ्या स्थानकांतून केलेल्या बससेवेच्या नियोजनात बदल केला आहे. त्यानुसार आता बससेवा शहरातील पूर्वीच्याच बस स्थानकांतून सुटणार आहे. काही महिन्यांपासून बससेवेचे नियोजन बदलण्यात आले होते. परंतु, आता पुन्हा एकदा पूर्वीच्याच स्थानकांमधून त्या, त्या मार्गावरील बससेवा सुटणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर, शहरात सर्वच ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. तसेच व्दारका चौफुलीमार्गे वाहतूक बंद करण्यात आली होती. या सर्व परिस्थितीचा विचार करुन राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला नाशिकमधून सुटणाऱ्या बससेवेचे शहरातील स्थानकांनुसार नियोजन करणे भाग पडले. शहरात रस्त्यांच्या खोदकामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठक्कर बाजार, महामार्ग बस स्थानक आणि मेळा या प्रमुख बस स्थानकांतून सुटणाऱ्या बससेवेचे वर्गीकरण करण्यात आले. या प्रमुख बस स्थानकांवरील बोजा कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बससेवा पंचवटीतील निमाणी या शहर बससेवेसाठी असलेल्या स्थानकाकडे वळविण्यात आली. म्हणजेच निमाणी बस स्थानकातून बससेवेचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सुरत, धुळे, सटाणा, मालेगाव, नंदुरबार, शहादा, सप्तश्रृंगी गड, दिंडोरी या भागाकडे जाणाऱ्या बसेस निमाणी बस स्थानकातून सोडण्यात येऊ लागल्या.

काही महिन्यांपासून करण्यात आलेल्या या बदलामुळे निमाणी बस स्थानकातील भार अचानक वाढला. आधीच या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आणि अरुंद रस्ते असल्याने सतत वाहतूक कोंडी होत असताना बससेवेच्या नवीन बदलामुळे कोंडीत अधिकच भर पडली. निमाणी परिसरात कायमच वाहतूक कोंडी होऊ लागली. शिवाय,पश्चिम नाशिकमध्ये राहणाऱ्या आणि पूर्वेकडे जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी हा बदल अधिक त्रासदायक ठरला. रिक्षा, शहर बससेवेतून त्यांना निमाणीपर्यंत येणे भाग पडल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड पडू लागला. शिवाय निमाणी बस स्थानकात उतरुन अंबड, सिडको, सातपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचाही खर्च वाढला.परंतु, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर राज्य परिवहन मामंडळाच्या नाशिक विभागाने पूर्वीच्याच स्थानकांतून बससेवा देण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांचा त्रास वाचणार आहे.

नवीन बदल

यासंदर्भातील नवीन वेळापत्रकानुसार काही प्रमुख मार्गांवरील बसेस कोणत्या स्थानकांतून सुटणार, ते पुढीलप्रमाणे – मेळा बस स्थानक- पुणे, जळगाव, धुळे, मालेगाव, येवला, मनमाड, कोल्हापूर.

नवीन बस स्थानक (ठक्कर बाजार) – त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सप्तश्रृंगीगड, पेठ, सुरगाणा, कळवण

महामार्ग बस स्थानक (मुंबई नाका) – मुंबई, सुरत, शिर्डी, अहिल्यानगर, बलसाड . प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.