नाशिक – बदलती जीवनशैली, वाढता मानसिक तणाव, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुण वयोगटासह सर्वांमध्येच हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात (गोल्डन अवर) रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी नाशिक जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेली ‘स्टेमी’ सुविधा अत्यंत प्रभावी ठरत आहे. नाशिक जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक रुग्णांना या सेवेचा लाभ घेता आला आहे.

​’स्टेमी’ प्रकल्पांतर्गत रुग्णाला छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटू लागल्यास तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात ईसीजी काढला जातो. काढलेला ईसीजी क्लाऊड तंत्रज्ञानाद्वारे तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांकडे (कार्डिओलॉजिस्ट) पाठवला जातो. तज्ज्ञ डॉक्टर अवघ्या काही मिनिटांत अहवालाचे विश्लेषण करून हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता ओळखतात. निदानानंतर तातडीने आवश्यक औषधोपचार सुरू केले जातात. तसेच, ज्या रुग्णांना पुढील उपचारांची गरज आहे, त्यांना मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाते.

​दरम्यान, नागरिकांनी छातीत तीव्र वेदना किंवा दडपण येणे; जबडा, मान, खांदा किंवा डाव्या हातात वेदना होणे; श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे; अचानक खूप घाम येणे, चक्कर येणे किंवा मळमळणे आदी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा डॉक्टरांशी संपर्क साधावा.​सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय तसेच काही निवडक खाजगी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही ‘स्टेमी’ सुविधा मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी किंवा आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांनी ‘१०४’ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

तपासणीसाठी पुढे यावे…

​मागील वर्षीच्या तुलनेत तपासणीचे प्रमाण वाढले असले, तरी लक्षणे असलेल्या अनेक व्यक्ती अजूनही तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा. हृदयविकाराच्या झटक्यात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. स्टेमी सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचवणे शक्य होत आहे. नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी. – डॉ. राजेंद्र बागूल (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक).

​नाशिक जिल्ह्याची आकडेवारी ?

​गेल्या वर्षभरात जिल्ह्यात या सुविधेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे: ७५,०२४ ईसीजी तपासण्या झाल्या असून, यामध्ये ‘स्टेमी’ तीव्र झटका आलेले ३७६ रुग्ण, तर २,१०८ गंभीर रुग्ण होते. ​जिल्हा, उपजिल्हा,ग्रामीण रुग्णालयात ५१,६२७ ईसीजी तपासण्या झाल्या. २५४ रुग्णांना ‘स्टेमी’ तीव्र झटका आला होता, तर १,५०३ गंभीर रुग्ण आढळले.

​आतापर्यंत एकूण १,२६,६५१ तपासण्या झाल्या असून त्यातील ६३० ‘स्टेमी’ रुग्ण, तर ३,६११ गंभीर रुग्ण आढळले आहेत.