नाशिक : महाविद्यालयीन अभ्यास प्रकल्प अयशस्वी झाल्याच्या तणावातून दिल्ली आयआयटीच्या वसतिगृहात वरद नेरकर (२३) या नाशिक येथील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर पॉलिमर सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी संस्थेला खुले पत्र देऊन प्रयोगशाळा, महाविद्यालयातील कार्यपध्दतीवर प्रकाशझोत टाकत आंदोलन केले. एम.टेकच्या विद्यार्थ्यांवर शैक्षणिक कामे व प्रयोगाचा प्रचंड तणाव आहे. उपरोक्त घटनेच्या पार्श्वभूमीवर, संस्थेने तातडीने बैठक बोलवावी आणि वरदला असा टोकाचा निर्णय घेण्यास पाडणाऱ्या परिस्थितीची निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक येथील वरद हा दिल्ली आयआयटीत एम.टेकच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. गुरुवारी वसतिगृहात त्याने आत्महत्या केली. प्रकल्प अयशस्वी ठरल्याने तो मानसिक तणावाखाली होता, मार्गदर्शकाकडून अपेक्षित सहकार्य त्याला मिळाले नाही, असा आक्षेप पालकांनी आधीच नोंदविला होता. या घटनेनंतर सोमवारी वरदच्या अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी विभागप्रमुखांच्या दालनासमोर ठिय्या दिला. प्रयोगशाळा, शिक्षकांची अवाजवी अपेक्षा, त्यामुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण असे अनेक मुद्दे त्यांनी पत्राद्वारे संस्थेच्या व्यवस्थापनासमोर मांडले. या घटनेबाबत सर्व संबंधितांची तात्काळ खुली बैठक बोलावणे अपेक्षित होते. परंतु, तसे घडले नाही. यातून विभागाची असंवेदनशीलता प्रगट झाली. अशा काही गोष्टी घडल्या तरी विभागाला त्याची पर्वा नसल्याचा संदेश यातून गेल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी नोंदविला.

हेही वाचा…नाशिक : पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्याने गोळी झाडली, अन…, अंबड पोलीस ठाण्यातील घटना

वरदला प्रयोगशाळेकडून पुरेसा निधी मिळाला नाही. रसायने, उपकरणे कशी विकत घेता येतील, यामुळे तो तणावात होता. आवश्यक मदत मिळाली नसल्याची बाब त्याने अनेकदा मांडली होती. एम.टेकच्या विद्यार्थ्यांची तुलना पीएचडीच्या विद्यार्थ्यांशी केली जाते. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये ‘टीचिंग असिस्टंटशिप’सह शिक्षणक्रमाचा अभ्यास आणि प्रकल्पाचा समावेश असून ते अतिशय कठीण आहे. पर्यवेक्षक विद्यार्थ्यांनी जास्तीचे काम करावे, अशी अपेक्षा धरतात. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या तयारीसाठी वेळ मिळत नाही. विद्यार्थ्यांना पार्श्वभूमीशी संबंधित नसलेल्या विषयाचे प्रकल्प दिले जातात. कुठलेही योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मटेरियल सायन्स प्रयोगशाळेतील कामकाज एका दिवसांसाठी थांबवून विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक कामामुळे निर्माण झालेला ताण, दबाव दूर करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik student did suicide in iit delhi triggers student protest of polymer science and technology department psg
First published on: 20-02-2024 at 16:33 IST