नाशिक – नाशिकसारख्या विकासाच्या मार्गावर झेपावणाऱ्या जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी शाळांपर्यंत पोहचण्याचा मार्ग मात्र बिकट आहे. देवळाली छावणी परिषदेजवळील शिंगवे बहुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यापैकीच एक. या शाळेत विद्यार्थ्यांना चक्क नाल्यातून वाट काढत जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास विद्यार्थ्यांचा शाळेचा मार्गच बंद होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शाळेपासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या चारणवाडी (पाषाणनगर) या वस्तीत सुमारे एक हजार लोकसंख्या आहे. या वस्तीतून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिंगवे बहुला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षणासाठी येतात. मात्र, शाळेकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना नाल्यातून आणि झाडी-झुडपांतून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. सदर नाला मोठ्या आकाराचा असून पावसाळ्यात त्याला अधिक पाणी असते. पूरपरिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य होत नसल्याने अनेकदा शाळेला अनुपस्थित राहावे लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांनीही आपल्या पाल्यांना या शाळेत पाठविणे कमी केले असून, काही पालक आपल्या मुलांना सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील छावणी परिषदेच्या शाळेत प्रवेश देत आहेत.
विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने तसेच शिवयुवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी व्हॅनची सुविधा सुरू केली होती. मात्र, कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोजाड यांनी सांगितले की, “काही वर्षांपूर्वी या शाळेची पटसंख्या ३५० पेक्षा अधिक होती. पाषाणनगर परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे शिक्षण घेत होते. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही. शाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना रस्ता नसल्याने तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. परिणामी शाळेची पटसंख्या ५० वर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी मोजाड यांनी केली.
रस्ता झाल्यास शाळेची पटसंख्या वाढेल
नाल्यावर पूल अथवा सुरक्षित रस्ता उपलब्ध झाल्यास पाषाणनगरसह परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सुलभ होणार असून शाळेची घटलेली पटसंख्याही पुन्हा वाढण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षक व पालकांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
