नाशिक – नाशिक शहरात गुन्हेगारी जोमात असताना जानेवारी २०१९ मध्ये पैशांच्या लोभाने एका व्यावसायिकाची त्याच्या घराखाली, त्याच्या चार वर्षांच्या मुलासमोर चौघांनी हत्या केली होती. या हत्येने संपूर्ण नाशिक हादरले होते.
कारण, हत्या झालेली व्यक्ती नाशिकच्या इंदिरानगरमध्ये असलेल्या बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध अशा सुपर ग्राहक बाजारची मालक होती. अविनाश शिंदे हे त्यांचे नाव. अविनाश शिंदे यांची हत्या ज्याप्रकारे झाली होती, त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही प्रचंड संतप्त झाले होते.
काहीही झाले तरी या हत्या प्रकरणातील संशयित शोधायचे आणि त्यांना अधिकाधिक शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले होते. त्याप्रमाणे संशयित सापडलेही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल झाल्यावर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी या खटल्याचा निकाल लागला. आणि चार आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. पुराव्याअभावी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
इंदिरानगरमध्ये बापू बंगला हे सर्वाधिक प्रसिध्द ठिकाण आहे. या बापू बंगल्याजवळच अविनाश शिंदे यांचे सुपर ग्राहक बाजार हे दुकान. आठ जानेवारी २०१९ रोजी रात्रीचे १० वाजले होते. शिंदे हे दुकान बंद करून चार वर्षाचा मुलगा अभय याच्यासह गणाधिराज अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या फ्लॅटकडे निघाले होते. त्यांच्याकडे दुकानात त्या दिवशी झालेल्या विक्री झालेल्या मालाचे आणि त्यांच्याकडील काही असे सुमारे सहा लाख रुपये असलेली बॅग होती.
गणधिराज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आरोपी आधीच दबा धरून बसले होते. शिंदे तिथे पोहोचताच आरोपींनी त्यांच्याकडील बॅग हिसकावली. शिंदे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. आपल्या वडिलांवर होत असलेला हल्ला पाहून चार वर्षांचा अभय थरथर कापत होता. पैशांची बॅग घेऊन आरोपी दोन दुचाकींवरुन पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदे यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
आधीच काही गुन्हेगारी घटनांमुळे वैतागलेले नाशिककर या हत्येमुळे प्रचंड संतप्त झाले. तत्कालीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासाचे आदेश दिले. तपासात विलास मिरजकर याने संघटित टोळी बनवून हत्या केल्याचे उघड झाले. आरोपी पकडण्यात आले. आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
मंगळवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी या खटल्याचा निकाल दिला. सुनील रामचंद्र पवार, चिमा उर्फ सतीश नाना पवार, विलास राजू मिरजकर आणि नारायण उर्फ आप्पा रामप्रसाद बसनेत या आरोपींना जन्मठेप आणि ११ लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला. दंडाच्या रकमेतून पाच लाख रुपये मृताच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
विशेष सरकारी वकील डॉ. सुधीर कोतवाल यांनी एकूण ४३ साक्षीदार तपासले. घटनेच्या वेळी तिथे असलेला अविनाश शिंदे यांचा चार वर्षांचा मुलगा अभय मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला.
किरण उर्फ गोट्या म्हस्के याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. सरकारी वकील रेश्मा जाधव आणि जगदीश सोनवणे यांनी सहकार्य केले, तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासाची भूमिका महत्त्वाची ठरली.
