मालेगाव : मोबाईलच्या अति वापरामुळे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान हा सार्वजनिक चिंतेचा विषय बनत चालला आहे. मोबाईलच्या व्यसनामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. या समस्येवर मालेगाव तालुक्यातील तळवाडे गावाच्या महिला सरपंचाने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून या गावाने ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज विशिष्ट कालावधीसाठी मोबाईल व टीव्हीला सुट्टी देण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी आरंभला आहे. त्याचे चांगले परिणाम जाणवू लागले आहेत.
एकेकाळी ‘पाटी आणि पेन्सिल’ अशी ओळख असलेल्या शालेय जीवनात आता ‘स्मार्टफोन आणि इंटरनेट’ ने जागा मिळवली आहे. करोना काळात शिक्षणाचे साधन म्हणून घरात शिरलेला मोबाईल आता मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे मोबाईल असणे ही बाब अत्यंत सामान्य आहेच पण, शालेय विद्यार्थ्यांच्या हातातही आजकाल मोबाईल दिसू लागले आहेत.
मोबाईल सारख्या साधनांचा अभ्यासासाठी वापर झाला तर ते स्वागतार्हच आहे, परंतु अभ्यासाऐवजी मोबाईलद्वारे व्हिडिओ, ऑनलाइन गेम, सोशल मीडियाचा वापर करण्यात मुलांचा अधिक वेळ जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे केवळ अभ्यासावरच नाही तर मुलांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होत असल्याचे समोर येत आहेत. मोबाईलचा वापर करणाऱ्या मुलांचा कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सरपंचाची संकल्पना भावली
मोबाईलचे होणारे दुष्परिणाम टाळणे आणि त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे,यासाठी काही उपाय योजना कराव्यात या दृष्टीने तळवाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका सोनवणे यांनी गावात ‘अभ्यासाचा भोंगा’ ही संकल्पना मांडली. सोनवणे या उच्चशिक्षित असून गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. गावात शाळाबाह्य मुले राहू नयेत आणि आपल्या पाल्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या पालकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सरपंच म्हणून मिळणाऱ्या मानधनाच्या रकमेतून त्यांनी यापूर्वी संबंधित पालकांची शंभर टक्के घरपट्टी व पाणीपट्टी भरुन दिली होती. त्यांचे पती शामकांत सोनवणे हे मालेगाव पंचायत समितीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
सोनवणे यांनी मांडलेली ही संकल्पना ग्रामसभेत सर्वच गावकऱ्यांनी उचलून धरली. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ‘अभ्यासाचा भोंगा’ हा उपक्रम गावात सुरू करण्यात आला आहे. सरपंच सारिका सोनवणे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोरारजी शिरोळे, पोलीस पाटील चिंतामण शिरोळे,कमलाकर ततार, अनिल पवार, सिंधुताई निकम, सुभाष अहिरे, काकाजी शिरोळे, नंदिनी जाधव, गायत्री हिरे,ग्रामसेवक केदार पवार आदी उपस्थित होते.
नेमकी संकल्पना काय ?
तळवाडे हे ९ हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचे सातवीपर्यंत वर्ग आहेत. तसेच मराठा विद्या प्रसारक संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळांमधील मुलांनी मोबाईलपासून लांब राहावे व स्वतःला अभ्यासात गुंतवून घ्यावे यासाठी रोज रात्री साडे सात वाजता ग्रामपंचायतीतर्फे भोंगा वाजवला जातो. त्यानुसार साडेसात ते नऊ वाजेपर्यंत गावातील प्रत्येक घरातील मुलांना पालकांकडून दीड तास सक्तिने अभ्यासाला बसवले जाते.
विशेष म्हणजे दीड तासाच्या या कालावधीत घरात अभ्यासासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावे म्हणून,प्रत्येक घरातील टीव्ही देखील बंद केला जातो. हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून गावातील जागरुक तरुण स्वयंसेवकाची भूमिका निभावत आहेत. त्यानुसार ‘अभ्यासाचा भोंगा’ या कालावधीत या स्वयंसेवकांकडून मुले अभ्यास करीत आहेत का,आणि घरातील टीव्ही खरोखर बंद आहेत का यावर देखरेख ठेवली जात आहे. गावातील ज्या कुटुंबांमध्ये शाळेत जाणारी मुले नाहीत,अशा कुटुंबांकडून देखील या निर्धारित वेळेत टीव्ही बंद ठेऊन सामूहिक शिस्तीचे दर्शन घडवले जात आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
