नाशिक – महापालिका निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक, त्यातही मुख्यत्वे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे एका मुद्यावर मात्र उभयतांमध्ये एकमत आहे. नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीचा विषय गाजत आहे. या वृक्षतोडीस पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे. ठाकरे गटाचे माजी पर्यावरणमंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही पर्यावरणप्रेमींच्या भूमिकेला पाठिंबा देत झाडे वाचवून उपलब्ध पर्यायांचा विचार करण्याची आवश्यकता मांडली आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित निवडणूक लढवित आहेत. प्रचारार्थ बुधवारी शिवसेना शिंदे गटाचे संसदीय गटनेते खा. डॉ. शिंदे यांची प्रचार फेरी काढण्यात आली. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी पंचवटी आणि नंतर नाशिकरोड विभागात प्रचार फेरी काढली. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी तपोवनच्या मुद्यावर भाष्य केले. तपोवनाबरोबर सर्व लोक आहेत. शिवसेना नाशिककरांबरोबर आहे. तपोवनच्या बाजुने आहे. आम्ही पर्यावणरणप्रेमींच्याबरोबर आहोत. जुनी झाडे तोडली जाऊ नयेत. काही व्यवस्था करायची असेल तर पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी तपोवनमध्ये भेट दिली होती. त्यांनीही वृक्षतोडीला विरोध करुन इतर पर्याय अवलंबण्याची मागणी केली होती. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत किमान तपोवनच्या मुद्यावर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे एकमत झाल्याचे चित्र आहे.
नाशिक महापालिकेत भाजपने १०० पेक्षा अधिक जागांविषयी दिलेल्या नाऱ्यावर शिंदे यांनी आकड्यांच्या गणितात आम्ही जाणार नसल्याचे सूचित केले. नाशिक जिल्ह्यात अलीकडेच ११ पैकी पाच नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. महापालिकेत त्यापेक्षा अधिक यश मिळून शिवसेनेचा महापौर होईल, असा दावा त्यांनी केला. गतवेळी नाशिक महापालिकेत शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीअजित पवार गट एकत्रित असल्याने जास्त यश मिळेल.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना नाशिकला मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. कुंभमेळ्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून विकास कामे होतील, असे त्यांनी नमूद केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील ६४ नगर परिषदांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. इतक्या यशाची कोणी अपेक्षा केली नव्हती. संपूर्ण राज्यात शिवसेना शहरापुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. जिथे ताकद नव्हती. तिथे शिवसेनेेचे नगराध्यक्ष झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
