नाशिक – कोणत्याही आजारापेक्षा कर्करोग हा अधिक धोकादायक असल्याने कर्करोग झाल्याचे समजताच संबंधित व्यक्ती तर हादरतेच, परंतु घरातीस सर्व सदस्य चिंतेच्या छायेखाली येतात. घरातील संपूर्ण वातावरण या एका बातमीने विस्कळीत होते. कर्करोगावरील उपचारासाठी येणारा खर्चही अधिक असल्याने महिन्याचा पगार किंवा महिन्याच्या येणाऱ्या उत्पन्नापैकी निम्म्यापेक्षा अधिक पैसा कर्करोगावरील उपचारातच खर्च होतो.
त्यामुळे कर्करोग हा जीवघेणा आजार कोणालाही होऊ नये, अशीच सर्वांची भावना असते. कर्करोगावरील अत्युच्च उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाणे सर्वांना परवडत नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी संपूर्ण क्षमतेचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात यावे, यासाठी आता नाशिकच्या आमदारांची बैठक आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कर्करोग उपचारांचा वाढता खर्च सर्वसामान्य नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शासनाच्या वतीने कर्करोग रुग्णांना आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न होत असला तरी भरमसाठ खर्चामुळे हे उपचार करताना सर्वसामान्य कुटूंबांच्या नाकीनऊ येतात. देशात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
त्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांवरील किमोथेरपी, रेडिएशनसारख्या उपचारांचा खर्च अधिक असतो. बहुसंख्य कुटूंबान हा आर्थिक भार पेलता येत नाही. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांच्या हितासाठी टाटा रिसर्च सेंटरची स्वतंत्र व पूर्ण क्षमतेची शाखा सुरू करावी, अशी मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात केली.
आमदार फरांदे यांनी प्रश्न उपस्थित करत टाटा रिसर्च सेंटरची शाखा उभारण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी शासकीय योजनांमधून मिळणारी मदत आणि उपचारावर होणारा खर्च मांडत सर्वसामान्य कुटूबांना हा खर्च पेलता येत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे खर्चाने कंबरडे मोडत आहे, याकडे लक्ष वेधले. खासगी आणि शासकीय रुग्णालयांतील उपचारासाठी येणाऱ्या खर्चातील तफावतीचा मोठा फटका रुग्णाच्या कुटूंबाना बसत असल्याचे देवयानी फरांदे यांनी नमूद केले.
या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर देतांना नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयात लवकरच कर्करोग उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. देवयानी फरांदे यांचे या उत्तरावर समाधान झाले नाही. संदर्भ सेवा रुग्णालयात मर्यादित क्षमतेतच उपचार करता येऊ शकतील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी विशाल असे अत्याधुनिक, संपूर्ण क्षमतेचे कर्करोग रुग्णालय आणि टाटा रिसर्च सेंटरची शाखा उभारण्यात यावी, अशी मागणी केली.
नाशिकच्या सर्व आमदारांची तातडीने बैठक घेऊन हा निर्णय मार्गी लावावा, अशी विनंतीही फरांदे यांनी केली.आरोग्यमंत्री आबिटकर यांनी देवयानी फरांदे यांची विनंती मान्य करुन नाशिकच्या आमदारांची लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र असल्याने टाटा रिसर्च सेंटरची शाखा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील हजारो कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकले, असे देवयानी फरांदे यांनी नमूद केले.

