नाशिक – संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या नाशिक येथील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण, धमकावणी, धर्मांतरण प्रकरणात विशेष तपास पथकाने पहिल्या गुन्ह्यासाठी ९०० पानांचे पहिले दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी जवळपास पूर्णत्वास नेली आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणातील तपासाला वेग दिला आहे. प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी आणि कंगोरे उघडकीस आल्याने या प्रकरणी आरोपपत्र कधी दाखल होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग आणि एका महिला कर्मचारीसह पुरुष कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी टाकण्यात आलेला दबाव, त्यांना देण्यात आलेला त्रास याप्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल आहेत. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी टीसीएस कंपनीतील एका पीडित युवतीने तक्रार दाखल केल्यावर सर्व प्रकरण चर्चेत आले. या एका तक्रारीनंतर कंपनीतील संशयितांच्या जाचाला कंटाळलेले इतर काही कर्मचारीही तक्रार देण्यासाठी पुढे सरसावले. पीडितांनी केलेल्या तक्रारींमधील दाव्यांमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली. देश पातळीवर या प्रकरणाची चर्चा झाली.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पीडितेने केलेल्या तक्रारीवरुन कंपनीतील दानिश शेख, तोसिफ अत्तार आणि निदा खान या तीन संशयितांविरुध्द लैंगिक शोषणासह धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर विशेष तपास पथकास दानिश शेख आणइ तौसिफ अत्तार या दोघांना अटक करण्यात फारसा वेळ लागला नाही. परंतु, या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार म्हणून जिचे नाव घेतले जात होते. ती निदा खान कित्येक दिवस फरार होती. फरार असतानाच निदा खानच्य वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्जही दाखल केला. ४० पेक्षा अधिक दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खानला अखेर छत्रपती संभाजीनगर येथून सात मे रोजी ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्याला २६ मे रोजी ६० दिवस पूर्ण होणार असल्याने न्यायालयात आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल करावे लागणार आहे.

राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतलेल्या टीसीएस प्रकरणांमध्ये आयोगाच्या तथ्यशोधन समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला. टीसीएस कंपनीतील नऊ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत असिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार, दानिश शेख, अश्विनी चैनानी आणि निदा खान यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयात या गुन्ह्यांपैकी पहिल्या गुन्ह्यात ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संशयितांविरुध्द या दोषारोपपत्रात लैंगिक शोषण, फसवणूक, कट रचून धर्मांतराचा प्रयत्न, संशयितांच्या मोबाईलमधील मिळालेली माहिती, संभाषण याविषयीचा उल्लेख असल्याचे पुढे आले आहे. पहिल्या गुन्ह्याविषयी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर इतर उर्वरित गुन्ह्यांविषयीही दोषारोपपत्र लवकरच दाखल केले जाणार आहे.