नाशिक – टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात ४० दिवसांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून रात्री ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात शुक्रवारी नाशिकरोड सत्र न्यायालयाने तिला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. निदा खान गरोदर असल्याने आईला दिवसातून दोन वेळा तिला भेटण्यास परवानगी देण्यात आली.
टीसीएस प्रकरणी नऊ वेगवेगळ्या गुन्ह्यांत सात संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गेल्या २६ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून निदा खान फरार होती. या गुन्ह्यातील संशयित दानिश शेख आणि तौसिफ अख्तर हे न्यायालयीन कोठडीत आहेत. या काळात निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. नाशिक व छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत निदा खानला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला नाशिकमध्ये आणण्यात आले.
शुक्रवारी नाशिकरोड सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर विविध मुद्द्यांवर निदा खानला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केली. संशयितेने दबाव टाकून पीडितेच्या धर्मांतराचा प्रयत्न केला, तिने पीडितेला दिलेला बुरखा जप्त करण्यात आला आहे. पीडितेच्या भ्रमणध्वनीत विशिष्ट ॲप्लिकेशन निदा हिने डाऊनलोड करून दिले. धार्मिक शिक्षण देणाऱ्या यूट्यूब, इन्स्टाग्राम लिंक आणि रिल्स पाठवल्या. या गुन्ह्यात निदा खानला कोणी अर्थसहाय्य व मदत केली, फरार काळात कोणी आश्रय दिला आदींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे मिसर यांनी सांगितले.
तपासात आता मलेशियातील ‘इम्रान’ हे एक नाव पुढे आले आहे. पीडितेला मलेशियाला नोकरीसाठी इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठविण्याचे संशयितांचे नियोजन होते. हा काय प्रकार आहे, याचा तपास आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले. तर बचाव पक्षाने गरोदर व्यक्तीला कमीत कमी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निदा खानची ११ मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
‘बुरखा’ प्रतिबंधित वस्तू आहे का?
निदा खानच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. पोलीस कोठडीसाठी सरकारी पक्षाने दिलेले काही मुद्दे संयुक्तिक नसल्याचे त्यांनी नमूद केले. बुरखा कुठून आणला हे कारण होऊ शकत नाही. बुरखा प्रतिबंधित वस्तू नाही, ती सहजपणे कुठेही मिळू शकते. अँप डाऊनलोड करणे, भ्रमणध्वनीत लिंक मिळवणे वा पाठवणे हेदेखील अवघड नाही. भ्रमणध्वनीतील सर्व माहिती उपलब्ध असून तो जप्त झालेला आहे. त्यामुळे तोंडी चौकशीसाठी एका गरोदर व्यक्तीला किती पोलीस कोठडी द्यावी, याचा विचार करावा, अशी विनंती न्यायालयाकडे केल्याचे कासलीवाल यांनी सांगितले.
