Nashik TCS Case investigation reveals Nida Khan sent 171 controversial links to victim for religious conversion : संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या नाशिक येथील टीसीएस प्रकरणात दररोज नवनवीन माहिती मिळत आहे. टीसीएसमधील महिला कर्मचारीवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान सध्या १४ दिवसांच्या न्यायालीन कोठडीत आहे. निदा खानने गुन्ह्यात मदत करण्यासह संबंधित महिला कर्मचारीचे मत परिवर्तन करण्यासाठी आधुनिकतेची कास धरली. तिने तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाल्याचे पुढे आले आहे.

नाशिक शहरातील भद्रकाली भागात घास बाजारात लाकडे विकून निदा खानचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती अशी गरिबीची असताना निदा खानने उच्च शिक्षण घेऊन घरची गरीबी दूर करण्याऐवजी वेगळ्याच प्रकरणांमध्ये अधिक लक्ष दिल्याचे दिसते. नाशिक येथील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रास देणे, युवा कर्मचाऱ्याला धमकाविणे, धर्मांतर करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे, असे प्रकार उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. टीसीएससारख्या प्रसिध्द कंपनीत असे प्रकार झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणातील संशयित विवाहिता निदा खान ४० पेक्षा अधिक दिवस फरार राहिल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. तिच्या अटकेनंतर पुढे येणारी माहिती चक्रावून टाकणारी आहे.

मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर

एसआटीने केलेल्या तपासात निदा खानच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. निदा खानने महिला कर्मचारीच्या मोबाईलवर १७१ वादग्रस्त लिंक्स पाठवून तिला मानसिकदृष्ट्या त्रास दिला. महिला कर्मचारीच्या मनात स्वत:च्या धर्माविषयी घृणा निर्माण करणे आणि विशिष्ट धर्माविषयी आकर्षण निर्माण करणे, हा या लिंक्स पाठविण्यामागील उद्देश होता. धर्मांतरासाठी वापरण्यात येणारी ही डिजिटल युक्ती थक्क करणारी म्हणावी लागेल.

देवळाली कॅम्प भागातील या महिला कर्मचाऱ्याचे नाव, गाव, तिचा धर्म अशी सर्व मूळ ओळख पुसून टाकून तिला नव्या पध्दतीने पुढे आणण्याची योजना होती, त्यासाठी संबंधित पीडितेचे नामकरण ‘हनिया’ असे करण्यात आले होते. निदा खानची हिंमत इतकी होती की, ती बिनदिक्कतपणे संबंधित महिला कर्मचारीच्या घरी जाऊन तिला विशिष्ट धर्माचे शिक्षण देणे, धार्मिक पेहराव परिधान करण्यास भाग पाडणे आणि विशिष्ट प्रार्थना म्हणवून घेणे, असे काम करीत होती. संबंधित महिला कर्मचाऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी निदा खानने जाणीवपूर्वक काम केल्याची माहिती पुढे आली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार आणि निदा या तिघांची समोरासमोर बसवून चौकशी होण्याची शक्यता आहे. टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीने केलेल्या तथ्य शोधन अहवालात नाशिक येथील कंपनीच्या केंद्रात असलेल्या उणीवा मांडल्या आहेत. या अहवालावर पुढे काय कार्यवाही होईल, ते पाहणेही महत्वपूर्ण ठरणार आहे.