नाशिक – शहरातील टीसीएस कंपनीत चार वर्षांपासून महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग व धार्मिक भावना दुखावणे आदी प्रकार सुरू असल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून समोर आले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी टीसीएसमध्ये पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अंतर्गत समिती कार्यान्वित आहे. वर्षभरात या समितीच्या बैठकाही पार पडल्या. मात्र या काळात समितीकडे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, धार्मिक भावना दुखावणे वा तत्सम स्वरुपाची एकही तक्रार आलेली नव्हती. महिला व बालकल्याण विभाग तसेच कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी टीसीएसमध्ये भेट दिल्यानंतर व्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक प्रकल्पात सहकारी कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या गैरकृत्यांविषयी पीडितांनी पुढे येऊन तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध नऊ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये महिलांवर अन्याय, अत्याचार, आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावणे, अश्लील टिप्पणी करणे, शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे आदी तक्रारींचा अंतर्भाव आहे. टीसीएस नाशिकमध्ये सुमारे २०० कर्मचारी काम करतात. यात निम्मे प्रमाण महिलांचे आहे.

पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने गांभीर्याने दखल घेत तक्रारींची चौकशी सुरू केली आहे. कंपनीच्या पुणे आणि मुंबई कार्यालयातील मनुष्यबळ विकास (एचआर) विभागाचे वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या घटनाक्रमानंतर व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरून काम करण्यास सांगितले आहे.

कंपनीतील गैरप्रकार समोर आल्यानंतर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुनील दुसाने तसेच कामगार उपायुक्त विभागाचे दुकान निरीक्षक विशाल जोगी यांनी टीसीएसमध्ये स्वतंत्रपणे भेट देऊन माहिती घेतली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कंपनीत पॉश कायद्याची अंमलबजावणी करण्यासााठी अंतर्गत समिती आहे. या समितीच्या वर्षभरात झालेल्या बैठकीची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कंपनीच्या प्रवेशद्वारावर या समितीचा फलकही अस्तित्वात आहे.

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जात आहे. शॉप ॲक्ट परवाना, पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टीसीएसच्या समितीची प्रत घेण्यात आली. कंपनीत नियमानुसार समितीच्या बैठका झाल्या, वर्षभरात नाशिकमध्ये कुठलीही तक्रार नसल्याचे दस्तावेज अधिकाऱ्यांनी सादर केल्याचे गोळे यांनी नमूद केले. सध्या कंपनीतील सर्व कर्मचारी घरून काम करीत असल्याची माहिती संबंधितांना देण्यात आली.

टीसीएसमधील पॉशच्या अंतर्गत समितीकडे महिलांनी तक्रारी करणे अपेक्षित होते, परंतु, तशा तक्रारी केल्या गेल्या नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या प्रवेशद्वारालगत पॉश समितीचा फलकही लावलेला आहे. या समितीकडे वर्षभरात एकही तक्रार आलेली नाही. या संदर्भात सद्यस्थितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल.

  • सुनील दुसाने (जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, नाशिक)