नाशिक – शहरातील टीसीएस कंपनीत घडलेल्या प्रकरणाचा निषेध आणि विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा दुचाकी मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
टीसीएस कंपनीत काही वर्षांपासून महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग, मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतर असे प्रकार घडत होते. नामांकित कंपनीत घडलेल्या या घटनाक्रमावर स्थानिक पातळीवर पडसाद उमटत आहेत. अलीकडेच भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट कंपनीवर मोर्चा काढून आंदोलन केले होते. काहींनी आत शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
या मोर्चानंतर उद्योग वर्तुळातून वेगळ्याच प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे भाजपला भाजप युवा मोर्चाचे आंदोलन हे आयटी कंपनी विरोधात नव्हते तर, त्या विध्वंसक अपप्रवृत्ती विरोधात होते, अशी सारवासारव करावी लागली होती. आयटी कंपन्यांसह औद्योगिक क्षेत्रास भाजप संरक्षण देईल, असे निवेदन देण्यात आले होते.
टीसीएस कंपनीतील प्रकरणाचा निषेध आणि हिंदू भगिनींच्या सन्मानासाठी भाजपच्या आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजातर्फे टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा दुचाकी मोर्चा काढण्यात आला. यात भाजपचे अनेक पदाधिकारी,नगरसेवक सहभागी झाले होते. पक्षाचे दोन आमदार मात्र अनुपस्थित होते. भगवे उपरणे व टोप्या परिधान केलेले मोर्चेकरी घोषणा देत सीबीएसला पोहोचले. मोर्चेकऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते.
मोर्चेकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असणारे निवेदन सीबीएसलगतच्या पुतळ्याजवळ ठेवले. नाशिकच्या पवित्र भूमीत कॉर्पोरेट जिहादचे विष पेरले जात आहे. टीसीएससारख्या मोठ्या कंपनीतील प्रश्न केवळ प्रशासकीय गोंधळ नसून तो एका विशिष्ठ मानसिकतेचा सुनियोजित हल्ला आहे. या प्रकरणाचे गांभिर्य प्रशासनाला वारंवार सांगूनही त्यांची अकार्यक्षमता व थंड प्रतिसाद जखमेवर मीठ चोळणारा असल्याचे सकल हिंदू समाजाने निवेदनात म्हटले आहे.
जिहादी मानसिकतेचा बिमोड करावा, कॉर्पोरेट क्षेत्राच्या आडून हिंदू मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या आणि धर्मांतर, छळाचा कार्यक्रम राबविणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढण्याची वेळ आल्याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. तक्रार करूनही प्रशासन डोळे मिटून बसणार असेल तर हा अपमान सहन केला जाणार नाही. भगिनींना नोकरीच्या ठिकाणी असुरक्षित वाटणे ही लाजीरवाणी बाब आहे. भविष्यात अशा गोष्टी घडल्या तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरात भगवंतांना साकडे घालून न्याय मिळवण्याची विनंती केली जाईल, अ्सेही निवेदनात म्हटले आहे.
टीसीएस प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होत नाही आणि महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचे सकल हिंदू समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
