पीटीआय, नवी दिल्ली
मुलींचे बालविवाह रोखून त्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देणार्‍या नाशिकच्या कुंदा जयवंत बच्छाव यांच्यासह देशातील ८२ गुणवंत शिक्षकांना शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीत आयोजित विशेष समारंभात हा गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील ‘शैक्षणिक पालकत्वा’च्या प्रयोगासोबतच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले सायन्स पार्क, हातगाडीवरील ह्य्मोबाईल सायन्स लॅबह्ण आणि क्यूआर कोड आधारित ह्य्ट्री टॉकह्ण अशा विविध कल्पक उपक्रमांनी यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छाप पाडली.

कुंदा बच्छाव यांनी १५० हून अधिक वंचित आणि गरजू मुलींना आर्थिक आणि शैक्षणिक आधार दिला. त्यामुळे या मुलींचे बालविवाह रोखण्यास मदत झाली आणि त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. कुंदा बच्छाव यांनी लोकसहभाग आणि ह्य्सीएसआरह्णच्या माध्यमातून तब्बल ५५ लाख रुपयांहून अधिक निधी उभारला असून, या निधीचा वापर शाळांचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केला आहे.

यंदाच्या पुरस्कारासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातील ४८ शिक्षक, उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निकमधील २१ शिक्षक व प्राध्यापक तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातील १३ कौशल्य प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

‘क्यूआर कोड’द्वारे झाडांबद्दल शिक्षण

राजस्थानमधील झालावाड येथील महात्मा गांधी शासकीय शाळेतील दिव्येंदू सेन यांनी कमी खर्चात आणि मोठ्या प्रमाणावर राबविता येतील असे उपक्रम विकसित केले. त्यात ‘व्हच्र्युअल बायोलॉजी लॅब’, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जीवशास्त्राचे शिक्षण आणि ‘ट्री टॉक’ या क्यूआर कोडवर आधारित वनस्पती शिक्षण प्रणालीचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचे उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध होण्यास मदत झाली.