नाशिक – काही महिन्यांपासून समायोजित ग्रंथपालासह शिक्षकांचे वेतन रखडले आहे. याशिवाय इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी येथे शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जमा झाले. या वेळी प्रभारी शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्याकडून मासिक वेतन कागदपत्र स्वाक्षरीशिवाय कुठलेही कामे होणार नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे असून शिक्षणाधिकाऱ्यांनी या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उपस्थितांनी केला.
काही वर्षांपासून जिल्हा शिक्षण विभागाची प्रतिमा डागाळली आहे. शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांना कारागृहाची हवा खावी लागत असतांनाही प्रलंबित प्रकरणांचा निपटारा झालेला नाही. मंगळवारी १५० हून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्तीस आलेले मुख्याध्यापक हे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा, यासाठी कुठल्याही संघटना, लोकप्रतिनिधींचा आधार न घेता शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दालनात जमा झाले. छोट्याशा दालनात तक्रारदांराना ताटकळत उभे राहत आपला क्रमांक कधी येईल, याची वाट पहावी लागली.
याविषयी ग्रंथपाल संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास सोनार यांनी, तीन महिन्यांपासून समायोजित ग्रंथपालांचे वेतन थांबवले असल्याचे सांगितले. याबाबत अधिकारी मासिक वेतनापलिकडे कुठल्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तयार नाहीत. शिक्षण उपसंचालकांकडे विचारणा केल्यास ते शिक्षणाधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात. टोलवाटोलवी सुरू आहे. मान्यता, वेतन यासह इतर प्रकरणे प्रलंबित असलेल्यांना पदरमोड करत कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. काहींवर हप्ते भरण्यासाठी दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर लागलेले शिक्षक तसेच अन्य घटकांना शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या कार्यकाळानंतर मागील तीन वर्षात कोणतीच मान्यता मिळाली नाही. तीन वर्षांपासुन शालार्थ संकेतांक, वैद्यकीय देयके, अनुकंपा, पदोन्नती यासह वेगवेगळी प्रकरणे प्रलंबित आहेत. आमदारांच्या नेतृत्वाखाली शिक्षक दरबार भरतात. परंतु, कोणतेही प्रकरणे निकालात निघत नाही, अशी नाराजी शिक्षकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिक्षक तसेच अन्य घटकांचे प्रतिनिधी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेणार आहेत.
