नाशिक : शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक विभागातील शिक्षक तसेच शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी आणि आ. किशोर दराडे यांनी एकत्र येत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला घेराव घातला. अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. वेतन पथकासह २८ फेब्रुवारीपर्यंत समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यानंतर आंदोलन स्थगित झाले.
काही वर्षांपासून शिक्षकांचे थकित देयक, शालार्थ संकेतांक, मुख्याध्यापक स्वाक्षरी, बदली, पदोन्नती, वैद्यकीय देयक यांसह काही प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. याबाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण विभाग ढिम्म असल्याने नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड येथील नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालयात शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात उपसंचालकांशी चर्चा झाली.
चर्चेत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आमदार दराडे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला घेराव घातला. यावेळी विभागातील शिक्षक शेकडोंच्या संख्येने समस्या घेवून उपस्थित होते. यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
आमदार दराडे, उपसंचालक संजय कुमार राठोड, शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासमोर शिक्षकांनी कामांविषयक तक्रारी आणि समस्यांचा पाऊस पाडला. शिक्षकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. शालार्थ आयडी,शिक्षक मान्यता, पुरवणी देयक, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांसह एकस्तर आणि कला शिक्षकांच्या समस्या, सेवा सातत्य, बदली मान्यता यांसारखे अनेक विषय लोकांनी सर्वांसमोर मांडले. आमदार दराडे यांनी उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना जनभावनेचा विचार न केल्यास कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत उपसंचालक कार्यालय आणि शिक्षण अधिकारी कार्यालयातून सर्व समस्यांचे निरसन करणयात येईल, अशी ग्वाही दोन्ही अधिकाऱ्यांनी दिली.
यासंदर्भात शांताराम देशमुख यांनी, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, वेतन पथक कार्यालयात मागील वर्षभरात एकही काम झाले नसल्याची तक्रार केली. खालची यंत्रणा सतत शिक्षक आणि लिपीक यांच्याकडून पैशांची मागणी करीत असून खूप काम असल्याचे सांगत टोलवाटोलवी करतात. शिक्षकांच्या संयमाची परीक्षा पाहिली जात असल्याची व्यथा त्यांनी मांडली.
दरम्यान, शिक्षक आणि अन्य घटकांच्या तक्रारीचा आवेग पाहता पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष गोरख कुणगर ,एस. बी. देशमुख, प्रदीप सांगळे , शिक्षक सेनेचे संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
