नाशिक : मतदार याद्यांचे अद्यावतीकरणात जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शिक्षकांचा समावेश असल्याने अध्यापनावर विपरीत परिणाम झाला आहे. पहिली घटक चाचणी अवघ्या काही दिवसांवर असतांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण कसा करणार, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. शिक्षक नसल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षकांअभावी असणारी अनुपस्थिती चिंताजनक झाली आहे.
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. या कामात नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातील दोन हजारांहून अधिक शिक्षकांवर बीएलओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या कामासाठी साधारणत: शिक्षकांना चार तासांहून अधिक वेळ शाळाबाह्य रहावे लागत आहे. याचा परिणाम अध्यापनावर होत आहे. शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढत आहे. जे विद्यार्थी शाळेत येतात, त्यांना दिवसभर वर्गात वेगवेगळ्या तासांमध्ये गुंतवून ठेवणे अवघड होत आहे.
वर्गात गडबड, गोंधळ, मारामारी हे प्रकार नेहमीचे झाले आहेत. बीएलओची कामे सांभाळणाऱ्या शिक्षकांचा भार हा अन्य शिक्षकांवर येत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. पहिली चाचणी परीक्षा १५ ऑगस्टनंतर होणारअसल्याने आठवी, नववी, दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा, असा शिक्षकांसमोर प्रश्न आहे. पुरूषोत्तम इंग्लिश स्कुलच्या शिक्षिका सुरेखा म्हस्कर यांनी याबाबत मत मांडले. शिक्षकांचे काम शिकविणे हे असताना काही वर्षांपासून त्यांना अशैक्षणिक कामे दिली जात आहेत. याचा परिणाम अध्यापनावर होत आहे. लवकरच पहिली घटक चाचणी होणार आहे.
आठवी, नववी, दहावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. बीएलओची जबाबदारी ही वेगवेगळ्या विषय शिक्षकांवर आहे. भाषा विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेता येईल. मात्र गणित, विज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न आहे. प्रथम सत्रात ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण होणे अपेक्षित असतांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांमुळे कामे अडकली आहेत.
शिकविणे वेगळे आणि अभ्यास देणे वेगळे, या मुलांना त्यांच्या विषयांच्या वेळी कसे अडकवून ठेवावे, हा प्रश्न आहे. एका शाळेतील २० हून अधिक शिक्षक या कामात व्यस्त असल्याने अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतवर याचा विपरीत परिणाम होत आहे. परीक्षेच्या आधी अभ्यासक्रम पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
