नाशिक – राज्यस्तरावर सध्या जनगणनेचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत नेहमीप्रमाणे यंदाही शिक्षकांना विशेषत: अनुदानित शाळांमधील शिक्षकांना सहभागी करून घेतले आहे. ऐन उन्हाळ्यात तापमानाने चाळीशी पार केलेली असतांना उन्हाच्या झळा सोसत शिक्षक सध्या दारोदारी जनगणनेच्या कामात व्यस्त आहेत. हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी दबाव आणला जात असतांना शिक्षकांना तांत्रिक, मानसिक, शारीरिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षकांवर येणारा दबाव पाहता संघटनांनी काही अघटित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.
राज्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत जनगणना प्रकिया राबविली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील ५००० हून अधिक शिक्षक जनगणनेच्या कामात आहेत. या कामामुळे अनेकांना उन्हाळी सु्ट्टीत ठरवलेला प्रवास, मंगलकार्य यासह अन्य कामांवर फुली मारावी लागली. कोणतीही पूर्वसूचना न देता भ्रमणध्वनीवर आलेल्या संदेशावर ही मंडळी कामाला लागली. विशेष म्हणजे यंदा डिजिटल जनगणना होत असल्याने या कामात सहभागी असलेल्या शिक्षकांना १२ रॅमहून अधिक क्षमतेचा भ्रमणध्वनी खरेदी करावा लागला. महिला शिक्षकांचे प्रमाण यामध्ये लक्षणीय आहे. सध्या या कामामुळे महिलांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनन ही जबाबदारी पेलणाऱ्या शिक्षकांना सकाळी सात ते रात्री उशीरापर्यंत हे काम करावे लागते. एका शिक्षकाला कमीत कमी २०० ते जास्तीजास्त ७०० घरे पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्या घरांना क्रमांक दिल्यानंतर त्यांचे काम सुरू होते. यामध्ये बऱ्याचदा नागरीक ओळखपत्र दाखवूनही सहकार्य करत नाहीत. अरेरावी करतात. घरांना कुलूप असते. काही वेळा माहिती संकलित करतांना तांत्रिक अडचणी येतात. पुन्हा त्या ठिकाणी जावे लागते. महिलांना झोपडपट्टी परिसरात माहिती संकलित करतांना मद्यपान केलेल्या, जुगारी तसेच शिवीगाळ करणाऱ्या काही जणांना तोंड द्यावे लागते. असुरक्षिततेच्या वातावरणात हे काम सुरू आहे. दुसरे म्हणजे उन्हाचा पारा चढलेला असतांना शहरात कुठे वीज पुरवठा खंडित असेल तर १५ हून अधिक मजले वर-खाली करावे लागतात. त्यांना नागरिकांनी सहकार्य न केल्यास कामे राहुन जातात. बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे असल्याने अपुऱ्या मनुष्यबळावर हे काम रेटले जात आहे. एकाच ठिकाणी काही वेळा माहिती पूर्ण न मिळाल्याने दोन ते तीन फेऱ्या होत असल्याने शिक्षकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
नाशिक जिल्ह्यात जनगणणा कामात शिक्षकांना तांत्रिक, शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: महिला शिक्षकांना झोपडपट्टी परिसरात काम करतांना असुरक्षितता वाटत आहे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी येणारा दबाव मानसिक ताण वाढवत आहे. तांत्रिक अडचणीमुळे कामे रेंगाळत आहेत.
प्रशासनाचा असणारा दबाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. दबाव आणू नये. जर एखाद्या शिक्षकाला दुखापत झाली किंवा त्याच्या जिवावर बेतले तर संबंधित अधिकारी त्यास जबाबदार असेल, असा इशारा दिला. – संजय चव्हाण (अध्यक्ष, राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना संघटना)
