नाशिक – त्र्यंबकेश्वरहून निघालेली श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी बुधवारी नाशिक नगरीत दाखल झाली. वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असला तरी दिंडीमुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला. शहरात कुंभमेळ्यामुळे सुरु असलेल्या रस्ता कामांचाही वारकऱ्यांना त्रास झाला.
त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावर दिंडीमुळे मंगळवारपर्यंत नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून आधीच करण्याआले होते. या आवाहनाकडे दुर्लक्ष करुन खासगी वाहने रस्त्यावर कायम राहिल्याने नाशिक-त्र्यंबक रस्त्याने दिंडी येत असताना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. बुधवारी दिंडीचे शहरात आगमन झाल्यावर तोच अनुभव आला. प्रशासनाकडून शहरात पालखी मार्ग मोकळा करण्यात आला होता. पालखी मार्गात इतर वाहने येणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली. परंतु, पालखी जशी पुढे गेली, त्याप्रमाणे मागील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत गेली. सातपूरच्या पुढे जिल्हा परिषद इमारत रस्यावर, एबीबी सर्कल परिसर तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर, अशोकस्तंभ परिसर, अहिल्यादेवी होळकर पुल तसेच अन्य भागात वाहतुक कोंडी शहरातही कायम राहिली.
पालखी त्र्यंबक नाक्याहून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आली असता त्र्यंबक नाक्यावर कोंडी झाली. परिणामी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केल्याने अशोक स्तंभाकडे येणाऱ्या रस्त्यांवर ताण आल्याने अशोक स्तंभ परिसरात अधिकच कोंडी झाली. वाहनधारक आपणास शक्य त्या मार्गाने वाट काढत होते.
पंचवटी परिसरात पालखी आल्यावर काही वारकऱ्यांनी गोदाकाठावर पर्यायी रस्त्यांचा अवलंब केला. सध्या गोदाकाठावर कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. बुधवारी गोदाकाठावर आठवड्याचा बाजार भरला असल्याने दिंडीला मुक्कामाचे ठिकाण असलेल्या गणेशवाडीपर्यंत पोहचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागले. गोदाकाठावर खोदलेले रस्ते आणि सतत पडणारा पाऊस यामुळे वारकऱ्यांना अडचणी आल्या.
शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल
निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी बुधवारी सकाळी सातपूर येथून प्रस्थान करून त्र्यंबक रस्त्यावरील पंचायत समिती, रामकुंड, काळाराम मंदिर मार्गे गणेश वाडीतील आयुर्वेद रुग्णालय येथे रात्रीचा मुक्काम करणार आहे. तर गुरूवारी सकाळी पालखी अमरधाम रस्त्याने टॅक्टर हाऊस, काठेगल्ली मार्गे नाशिकरोड, नंतर पळसे गाव येथे मुक्काम करेल. पालखी मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंगळवार ते गुरूवारपर्यंत वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत. पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली.
