नाशिक : आदिवासी विद्यार्थी आणि समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी व समाजबांधवांच्या वतीने मंगळवारी नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदिवासी आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. सरकारविरोधात घोषणाबाजी करत आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ‘उलगुलान मोर्चा’च्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस नेते विजयकुमार वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला. मोर्चेकरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी भेट घेणार आहेत.
आंदोलकांनी ईदगाह मार्गावरून जुनी जिल्हा परिषद, शालीमारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर आदिवासी विकास भवन असा मोर्चा काढला. आदिवासी विकास भवन येथे मोर्चाचा समारोप झाला. मोर्चात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला.
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकूण ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये आदिवासी विकास भवनच्या भोंगळ आणि गलथान कारभारामुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयुक्त लीना बनसोड यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये भोंगळ व गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
आदिवासींची ४९० वसतिगृहे लक्ष्मण मानकर या संस्थेला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, बोगस आदिवासींना शासकीय सेवेत संरक्षण देऊ नये, तसेच शासन सेवेत अधिसंख्य पदांमुळे रिक्त असलेल्या १२ हजार ५०० जागांवर तत्काळ नोकरभरती करावी, आदी मागण्याही करण्यात आल्या. आंदोलनात रावण युवा फाऊंडेशन, आदिवासी नायक फाऊंडेशन, आदिवासी बचाव अभियान यांसह विविध संघटना सहभागी झाल्या.
विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
गेल्या दहा दिवसांहून अधिक काळापासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली असून काही विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू
आंदोलकांची काँग्रेस नेते विजयकुमार वडेट्टीवार यांनी भेट घेतली. आंदोलनाला पाठिंबा देताना वडेट्टीवार म्हणाले, ‘हे आंदोलन विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हिंमतीवर सुरू केले आहे. आम्ही विरोधक आहोत. जर जनतेचा आवाज सरकारपर्यंत जात नसेल, तर आम्ही तो पोहोचवू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही आंदोलकांची भेट घेतली. दरम्यान, आंदोलक काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी भेट घेणार आहेत.
