नाशिक – हवामान खात्याने दिलेल्या माहितीच्या भरवशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मंगळवारी ढगफुटी होण्याचा (म्हणजे एका दिवसात ३५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस) इशारा दिलो होता. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगत आवश्यक कार्यवाहीला सोमवारी दुपारपासूनच सुरुवात केली. मंगळवारी नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तीन तालुक्यांमधील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तश्रृंग गडावरील देवस्थान मंगळवारी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. या निर्णयांच्या धडाक्यामुळे नागरिकांमध्ये मंगळवारचा दिवस कोणती नैसर्गिक आपत्ती घेऊन येणार, याविषयी भीती पसरली असताना मंगळवारी सकाळपर्यंत ढगफुटीसारखी कोणतीच स्थिती निर्माण न झाल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळाला. ढगफुटीसाठी कारणीभूत ठरणारे ढग दुसऱ्याच दिशेकडे सरकल्याने नाशिक, त्र्यंबकेश्वरवरील ढगफुटीचे संकट टळल्याचे मानले जात आहे.

ढगफुटी होण्याच्या इशाऱ्यानंतर नाशिक जिल्हा प्रशासनाने त्वरीत काही निर्णय घेतले. त्यानुसार नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या पाच तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी बंद, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीणमधील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. वन विभागाने त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रातील दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, पहिनेसह इतर सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्र्यंबकेश्वर देवस्थान नऊ जुलैपर्यंत तसेच मंगळवारी सप्तश्रृंगी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक शहरात आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मूभा द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता खासगी आस्थापना, व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले.

प्रशासनाच्या या धावपळीमुळे सर्वसामान्यांमध्ये मंगळवारचा दिवस कसा उजाडतो, याची उत्सुकता होती. मध्यरात्री एक वाजेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. नाशिक परिसरात पहाटे पाचपर्यंत तो सुरु होता. परंतु, त्यानंतर काही वेळ त्याने विश्रांती घेतली. दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर, कसारा आणि इगतपुरी परिसरात मात्र पावसाचा जोर होता. नाशिक परिसरात दोन-तीन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. परंतु, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मुसळधार वगैरे असे त्याचे स्वरुप नाही. ढगफुटीसदृश पाऊस ज्या ढगांमुळे पडणार होता, ते ढग वेगळ्याच दिशेने सरकल्याने नाशिकवरील अतिवृष्टीचे संकट टळल्याचे मानले जात आहे. हे ढग तसेच संबंधित ‘भोवरा’ आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले (अहिल्यानगर) परिसराकडे सरकल्याचे सांगण्यात आले.

सध्या संततधारेमळे गोदावय्च्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इगतपुरी तालुक्यात पावसचा जोर अधिक आहे. सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने नार नदी दुथडी भरून वाहत आहे.