नाशिक: नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तविली असतांना जोरदार पावसाने त्र्यंबकेश्वरमध्ये जनजीवन ठप्प झाले. कुंभमेळ्याची कामे चालु असल्याने त्र्यंबकवासियांसह भाविक तसेच पर्यटक यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पावसामुळे कामाचा खोळंबा झाला.
त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार सुरु आहे. त्र्यंबकेश्वर येथे ढगफुटीची शक्यता वर्तविल्याने प्रशासनाने सर्वांना सर्तकतेचा इशारा दिला.
त्र्यंबकेश्वर येथील देवस्थान दोन दिवस भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर शहरात मंगळवारी शुकशुकाट होता. मंदिर बंदमुळे पूजेसाठी आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. या कामाचा फटका भाविकांना बसला आहे. कुशावर्त येथे स्नानासाठी आलेल्या भाविकांना रस्त्यावरील खड्ड्यांचाअंदाज येत नसल्याने ते खड्ड्यात पडून जखमी होत आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिर रस्ता, वाहनतळ परिसर, संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता, ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी अशा अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे भाविकांसह पर्यटकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पावसामुळे शहर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. खोदलेल्या रस्त्यावर माती आणि गाळ आल्याने पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या पहिने-भिलमाळ रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल पावसात वाहून गेला. त्यामुळे वाडासह अन्य ४० गावांचा संपर्क तुटला. या मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. प्रयागतीर्थंकडून तळवाडेकडे जाणारा कच्चा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशीच परिस्थिती जव्हार फाट्याकडून पिंपळद कडे जाणाऱ्या रस्त्याची आहे. या ठिकाणी वीजतारा तुटल्या आहेत. झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या आहेत. गंगा सागर तलाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. एका ठिकाणी कठडा तुटल्याने पाणी तलावाऐवजी रस्त्यावर येत आहे. पेगलवाडी ते शिवाचा मळा, तळवडे पुलावर पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये २४ तासापेक्षा अधिक वेळेपासून पाऊस सुरू आहे. नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी धरण, संवेदनशील ठिकाणाची पाहणी केली. तहसीलदार गणेश जाधव आणि अन्य अधिकारी मात्र नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी भ्रमणध्वनी उचलत नाही, नागरिकांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचा आरोप होत आहे. त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण भागात काही शाळांच्या भिंती कोसळल्या. आश्रमशाळांमध्ये पाणी शिरले.
गिरीश महाजन यांच्या ताफ्यातील वाहन चिखलात
मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत असतांना आखाड्यांमध्ये पाणी शिरल्याने पाहणी करण्यासाठी मंत्री महाजन गेले असता त्यांच्या ताफ्यातील वाहन चिखलात अडकले. महाजन यांनी स्वत: इतरांच्या मदतीने पोलिसांची गाडी पुढे काढली.
