नाशिक – श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. या निमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. भारतातील सर्व नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली असून विजेत्यांना लाखोंची बक्षिस मिळवता येणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. तो दर १२ वर्षांनी एकदा राज्यातील नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीच्या काठावर भरतो. अमृत मंथनाच्या आख्यायिकेत येणारा हा कुंभमेळा श्रद्धा, पवित्रता आणि नवनिर्माणाच्या शाश्वत चक्राचे प्रतीक आहे.
बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर, नाशिकची समृद्ध संस्कृती, मंदिरे आणि घाटांचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रतिबिंब या कुंभमेळ्यात दिसते. कुंभमेळा एक चैतन्यशील आणि जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त आध्यात्मिक उत्सव म्हणून नावारूपास आला असताना २१ व्या शतकाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करतो. देशाच्या परंपरेत रुजलेली एक ताजी आणि गतिमान दृश्य ओळख निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
नवीन बोधचिन्ह भक्ती आणि एकतेची कालातीत भावना अशा स्वरूपात साकार करणारी पाहिजे. आधुनिक, संदर्भात्मक आणि भारत आणि जगभरातील विविध प्रेक्षकांसाठी दृश्यदृष्ट्या आकर्षक असे बोधचिन्ह असावे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या संस्कृती, वारसा, स्थापत्य, विधी आणि नैसर्गिक सौंदर्यातून सहभागींना प्रेरणा मिळू शकेल. बोध चिन्ह संस्मरणीय असावे. ते सर्व व्यासपीठांवर श्रद्धा, उत्सव आणि कालातीत परंपरा व्यक्त करेल. ही रचना कुंभमेळा २०२७ साठी एक वेगळी दृश्य ओळख म्हणून काम करेल. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक साराचे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक हे बोध चिन्ह असावे, अशी अपेक्षा आहे.
बोधचिन्हासाठी कमाल आकार ५ एमबी (पीडीएफ), स्पर्धेत दिलेल्या लेआउटनुसार बोधचिन्हाची रचना ए १ आकाराच्या पोस्टरवर असावे. रंगीत, कृष्ण्धवल प्रतिमा आणि बोधचिन्हाबाबत माहिती देणारी १५० शब्दांची टिपणी असावी आदी निकष निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेत १२ वर्षावरील कुणीही सहभागी होऊ शकते.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठविता येणार असून देशभरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
