नाशिक – मुंबई येथे अलिकडे झालेल्या बैठकीत आगामी नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रत्येक आखाड्यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. सरकारच्या या घोषणेमुळे साधू, महंतांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी यापूर्वी हाती घेण्यात आलेली कामे आणि नव्याने जाहीर झालेला निधी हे एकत्रित आहेत की स्वतंत्र, याबद्दल त्यांच्यात संभ्रमावस्था आहे.

प्रयागराजनंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा भव्य दिव्य करण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरु आहेत. यंदाचा कुंभमेळा २२ महिन्याहून अधिक काळ सुरू राहणार आहे. मुख्य पर्वण्यांसाठी पर्यटक तसेच देश- विदेशातून येणाऱ्या भाविकांची लक्षणीय संख्या पाहता सुक्ष्म पातळीवर नियोजनाचा दावा प्रशासन करत आहे. प्रशासन कागदोपत्री कामे दाखवत आहे. अधिकारी केवळ गोड बोलतात, अशी साधू, महंतानी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात कुंभपर्वात सहभागी होणाऱ्या दहा आखाड्यांना शासनाच्या वतीने पाच कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करुन नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक आधी शासनाने प्रत्येक आखाड्याला दोन कोटी दिले होते. यामध्ये पायाभूत सुविधांसह धर्मध्वज आदी कामे झाली. कार्यक्रमात पाच कोटींची घोषणा झाल्याने नाशिकसह त्र्यंबकमधील दहाही आखाड्यांच्या साधू, महंताकडून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मात्र काही दिवसातच पाच कोटींच्या निधीविषयी आखाड्यांचे महंत, प्रतिनिधी यांच्याकडून संभ्रम व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद सरस्वती यांनी, शासनाने जाहीर केलेल्या निधीतून प्रत्येक आखाड्यात २० खोल्या, स्वच्छतागृह आणि मोठे सभागृह उभारण्याची मागणी केली होती, असे सांगितले. काहींनी केवळ निवासी खोल्या मागितल्या. प्रत्यक्षात आता पाच कोटी पूर्ण की आधीचे दोन कोटीही यामध्ये आहेत याविषयी स्पष्टता नाही. आधीचेही दोन कोटी यामध्ये असतील तर जीएसटी वाढीव रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शंकरानंद सरस्वती यांनी केली. प्रशासकिय पातळीवर जुना आखाडा, आवाहन, अग्नी, निरंजन, महानिर्वाणी, अटल यासह १० आखाड्यांशी प्रत्यक्ष जावून चर्चा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून खोल्या, पाणी यासह कोणत्या सुविधा मिळतील, याविषयी माहिती संकलित करण्यात येत आहे.

Nashik Kumbh Mela
मुंबई येथे झालेली बैठक (फोटो- लोकसत्ता टीम)

प्राधिकरणाचा दावा

शासनाने आधी जाहीर केलेल्या दोन कोटींचा समावेश नव्याने जाहीर केलेल्या पाच कोटींमध्ये आहे. या निधीच्या अनुषंगाने आम्ही आखाड्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहोत. काहींनी रस्ते, पाणी अन्य सुविधा मागितल्या. काहींना केवळ खोल्या हव्यात. त्यांच्या गरजांनुसार तसेच मागणीनुसार कामाच्या निविदा काढण्यात येत आहेत. याबाबत कुठलाही अंतिम निर्णय नाही. मात्र निधी एकुण पाच कोटींचा आहे. – शेखर सिंह (आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण)