नाशिक – २०२७ मध्ये गोदावरीच्या काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये विकास कामे सुरू आहेत. तब्बल ३५ हजार कोटींची कामे आणि ३५० लहान-मोठ्या प्रकल्पांमुळे सिंहस्थाला आतापासूनच महाकुंभाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे प्रारंभीचे नियोजन प्रयागराज महाकुंभात भाविकांच्या ओसंडून वाहिलेल्या गर्दीनंतर पूर्णत: बदलले. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात १२ कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्या आधारे तयारी सुरू आहे. देशातील कुठल्याही कुंभमेळ्यात आजवर झाला नाही, इतका खर्च यावेळी होत आहे. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत आराखडा १२ पट विस्तारला. यानिमित्त होणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये तब्बल ८५ टक्के कायमस्वरुपी कामे आहेत. उर्वरित १५ ते १६ टक्के कामे ही कुंभमेळ्यापुरती म्हणजे तात्पुरत्या स्वरुपाची आहेत. या गुंतवणुकीतून नाशिक-त्र्यंबकेश्वरला देशाची प्रमुख आध्यात्मिक राजधानी म्हणून नावारुपास आणण्याची तयारी करण्यात आली आहे.
गोदा प्रदूषण मुक्ती
कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. ज्या नदीत साधू-महंत व भाविक डुबकी मारतील, तीच प्रदूषणाच्या गर्तेत सापडली आहे. यातून तिला बाहेर काढण्यासाठी दीड हजार कोटींचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची कामे हाती घेतली आहेत. तर त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी प्रवाही राखण्यासाठी प्रस्तावित योजनेतून या नगरीची तहानही भागविली जाईल. यासाठी सुमारे २९० कोटींच्या योजनेवर काम सुरू आहे. या व्यवस्थेतून गोदावरी प्रवाही राखून कुंभमेळ्यात स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
रस्त्यांवर सर्वाधिक खर्च
कुंभमेळा अंदाजपत्रकातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ५१ टक्के रक्कम रस्ते विकासावर खर्च होत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाच्या विस्तारीकरणातून २८ किलोमीटरचा प्रवास सुसाट होण्याच्या मार्गावर आहे. नाशिक शहराला वाहतूक कोंडीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ६६ किलोमीटरच्या नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोडचे काम प्रगतीपथावर आहे. आठ हजार कोटींचा नाशिक रिंग रोड २५ गावांमधून जाईल. नाशिक शहरातील प्रमुख द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चौकाचे रुंदीकरण आणि भुयारी मार्गाचे (२१४ कोटी) काम हाती सुरू आहे. महापालिका प्रमुख २८ रस्त्यांची कामे करीत असून यातील बहुतांश सिमेंट कॉक्रिटचे आहेत. नाशिक विमानतळ ते शिर्डी विमानतळ, नाशिक-दिंडोरी मार्ग, घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गाचे विस्तारीकरण, समृद्धी महामार्गाला नाशिकमधून नवीन संलग्नता अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.
पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट
कुंभमेळ्यात लाखो भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी रेल्वे प्रवासाची सुविधा देण्याकरिता मध्य रेल्वे देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधांची उभारणी करीत आहे. यातून प्रवासी हाताळणी क्षमता वाढ, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे संचालन अधिक कार्यक्षमपणे करण्याचा उद्देश आहे. यापूर्वी कुंभमेळ्यातील प्रवासी वाहतूक नाशिक रोड रेल्वे स्थानकावर केंद्रित होती. यावेळी मात्र बहु-स्थानक प्रवासी व्यवस्थापनाची संकल्पना राबविण्यात येत आहे.
विमानतळाची क्षमता तिप्पट
नाशिक (ओझर) विमानतळाच्या विस्तारीकरणातून सध्याची ताशी ३०० प्रवासी वाहतूक, हाताळणी क्षमता एक हजारपर्यंत विस्तारणार आहे. सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून विमानतळावर नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारत उभारण्यात येत आहे. एक लाख १५ हजार २२० चौरस मीटर क्षेत्रात नवीन ॲप्रॉन उभे राहील. यामुळे विमान उभे करणे, प्रवासी चढ- उतार, सामान चढविणे आणि उतरविणे आदी सुविधा सुलभ होतील. वाहनतळासाठी २५ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवासी बोर्डिंग, एरो ब्रिज, स्कॅनर आदी सुविधा उपलब्ध होतील.
निधीचा विनियोग
देशभरातील साधू-महंतांच्या निवास व्यवस्थेसाठी उभारल्या जाणाऱ्या साधुग्राम म्हणजे तात्पुरत्या स्वरुपातील पायाभूत सुविधेसाठी १७ टक्के, पूल आणि उड्डाणपूल आठ टक्के, भाविकांसाठी वाहनतळ व वाहतूक व्यवस्था सहा टक्के, विद्युत पायाभूत सुविधा तीन टक्के, पाणी पुरवठा,सांडपाणी व्यवस्थापन दोन टक्के, नवीन घाट बांधणी, नदी काठावरील कामे दोन टक्के, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून (पोलीस व अग्निशमन दल) व्यवस्था एक टक्का असा निधी खर्च होत आहे.
सीसी टीव्हीचे विशाल जाळे
कोट्यवधी भाविकांच्या गर्दीतील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) आधारीत ५५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि १८ टेहळणी ड्रोनचे विशाल जाळे तयार करण्यात येत आहे. या नव्या प्रारुपाद्वारे चित्रीकरणाचे त्याक्षणी विश्लेषण करून महत्वाच्या घटनांची ओळख पटवली जाईल, जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने माणसांची हालचाल, गर्दीचे व्यवस्थापन, संशयास्पद घटना, वाहतूक नियंत्रण आदी बाबी साध्य केल्या जाणार आहेत.
