नाशिक – नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी नाशिकमध्ये ग्राम परिक्रमा तर त्र्यंबकेश्वर येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

शनिवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दुपारी १२. ०२ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे. ध्वजारोहणानिमित्त नाशिक येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजता ग्राम परिक्रमा निघणार आहे. तपोवनातील मैदानापासून निघणाऱ्या परिक्रमेत नाशिक येथील तीनही आखाड्यांचे साधू, महंत सहभागी होणार आहेत. पालखीत धर्मध्वज, कुंभ आणि गोदावरी यांची मूर्ती ठेवण्यात येणार आहे.

परिक्रमा यात्रा रामकुंड परिसरात आल्यावर सायंकाळी गोदाआरती होईल. शनिवारी ध्वजारोहण होणार असून सायंकाळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने सहा हजार आदिवासी बांधवाच्या सहभागात गोदाआरती होईल. या वेळी १३ आखाड्यांचे प्रमुख, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आदी उपस्थित राहतील.

दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता नगरपालिका, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, पुरोहित संघ यांच्या सहकार्याने सिंहस्थ धर्मध्वज शोभायात्रा काढण्यात येणार आहे. कुशावर्त तीर्थापासून निघणारी शोभायात्रा संपूर्ण गावातून फिरुन पुन्हा कुशावर्त तीर्थ येथे येईल. शोभायात्रेत ११ चित्ररथांचा सहभाग राहणार आहे. दशावतार, गंगावतार, कुंभमेळा, राष्ट्रपुरूषांचे जीवनकार्य यांची माहिती याव्दारे देण्यात येणार आहे. याशिवाय कांबळनाथ समाज, ठाकूर समाज तसेच आदिवासींचे तारपा नृत्य होईल. पेशवाई थाटही शोभायात्रेत अनुभवता येईल. यात्रेत गणेशाची पालखी, मुख्य ध्वज, मंगल कलशधारी महिला, ढोल, मृदूंग, टाळ हाती घेत वारकरी विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी सकाळी ११ वाजता पुरोहित संघाच्या वतीने ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल. दुपारी धर्मध्वजारोहण तसेच गोदाघाटावरही धर्मध्वज फडकविण्यात येईल. दुपारी तीन वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्र्यंबकेश्वर येथे घाटाची पाहणी करणार आहेत. सायंकाळी नाशिक येथे होणाऱ्या गोदाआरतीसाठी त्र्यंबकेश्वरहून सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, साधू, महंत रवाना होतील.