नाशिक – आगामी कुंभमेळ्यात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारी भाविकांची गर्दी पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी उपलब्ध जागेचा विचार करता ‘टेंट क्लिनिक’ या संकल्पनेवर काम सुरू करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरप्रमाणेच नाशिक महानगरपालिका हद्दीत टेंट क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने नाशिक महापालिकेच्या वतीने जादा मनुष्यबळ, रुग्णवाहिका आदींची मागणी करण्यात आली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा ही भाविकांसाठी पर्वणी आहे. कुंभपर्वात साधू,महंत यांचे अमृतस्नान झाल्यानंतर भाविकांसाठी घाट परिसर आणि गोदाकाठ खुला होणार आहे. या ठिकाणी पर्वणी काळात लाखोंहून अधिक भाविक स्नानासाठी येणार आहेत. भाविकांची गर्दी पाहता आपत्कालीन परिस्थिती उदभवून (ज्यामध्ये चेंगराचेंगरी, अन्नातून विषबाधा, बदलत्या वातावरणामुळे आरोग्य विषयक तक्रारी, साथीचे आजार) रुग्णांची संख्या वाढल्यास परिस्थितीला तोंड देण्यासाठी आगाऊ तयारी म्हणून त्र्यंबकेश्वर येथे ‘टेंट क्लिनिक’ या संकल्पनेवर भर देण्यात येणार आहे.

याच धर्तीवर नाशिक महानगर पालिका हद्दीत टेंट क्लिनिक पर्वणी काळातील चार महिने सुरू राहणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या तुलनेत नाशिक महानगरपालिकेचा विस्तार मोठा असल्याने प्राथमिक टप्प्यात गोदाकाठ, तपोवन परिसर, साधुग्राम या ठिकाणी टेंट क्लिनिक, टेंट हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. याविषयी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. धनेश्वर यांनी माहिती दिली.

नाशिक महापालिका हद्दीतील पंचवटीमधील इंदिरा गांधी रुग्णालय, दसकजवळील झाकीर हुसेन रुग्णालय, नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयासह अन्य तीन अशा सहा रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. या शिवाय तपोवन, साधुग्राम या परिसरात २१ ठिकाणी टेंट क्लिनिक राहतील. घाट तसेच वाहनतळ परिसरात १९ टेंट क्लिनिक राहतील. याशिवाय घाट परिसरात १३ ठिकाणी अतिदक्षता विभाग टेंटच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार आहे.

याठिकाणी रुग्णांवर प्राथमिक उपचार, प्राणवायू व्यवस्था, रुग्णाला दाखल करुन आवश्यक औषधोपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. याअंतर्गत चार महिन्यांसाठी कंत्राटी तत्वावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे किंवा अन्य जिल्ह्यातून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. याशिवाय १०० रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आल्याचे डॉ. धनेश्वर यांनी स्पष्ट केले.