नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांव्दारे प्रयत्न करण्यात येत आहेत. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यात उद्योग, व्यावसायिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. कुंभमेळ्यात उद्योगांचे नेहमीच योगदान राहिले आहे. हरित नाशिक, स्वच्छ नाशिकसह विविध उपक्रमांना उद्योगांचे सहकार्य राहिले आहे. आगामी कुंभमेळ्यातही त्यांचे योगदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी यासंदर्भात माहिती दिली. उद्योग, व्यावसायिकांना नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. नाशिकमध्ये उपलब्ध पायाभूत सोयीसुविधा, दळणवळणाची साधने, महामार्ग यामुळे गुंतवणूकदार या भागाकडे आकर्षित होत आहेत. आतापर्यंत झालेल्या सामंजस्य करारातून विविध उद्योग, व्यवसाय उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याचेही कुशवाह यांनी सांगितले.
नाशिक येथील हॉटेल ताज येथे सहा मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत होणारा कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट होणार आहे. हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. राज्यात गुंतवणूक, उद्योग वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.
नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी उद्योजक, व्यावसायिक, उद्योजकांच्या विविध संघटना यांच्याशी संवाद सुरू आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या समिटच्या माध्यमातून काही नवीन सामंजस्य करार होतील. कुंभ उद्योग संगम नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये दिवसभर विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद होईल, असेही उद्योग विकास आयुक्त कुशवाह यांनी सांगितले. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यावसायिकांशी संवाद साधण्यात येत आहे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी, ही गुंतवणूक परिषद उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी महत्वाचा टप्पा असणार आहेत. भविष्यात नाशिक उद्योजक आणि गुंतवणूकदाराचे पहिल्या पसंतीचे इन्व्हेस्टमेंट डेस्टीनेशन ठरेल. अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.
