नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने वेगवेगळ्या संकल्पनांवर काम केले जात आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रमुख मंदिर संस्थानांचे विश्वस्त आणि प्रतिनिधींना एकत्र आणून निर्माल्य व्यवस्थापनासाठी शाश्वत आराखडा तयार करण्यात येणार आहे. या अनुषंगाने १८ जून रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी भाविकांची होणारी गर्दी, त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर होणारे प्रदुषण, या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने पर्यावरणपूरक हरित कुंभसाठी सुक्ष्म नियोजनावर भर देण्यात येत आहे. मंदिरांचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरे माेठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी दर्शनासाठी येणारे भाविक, देवाला त्यांच्याकडून वाहण्यात येणारी फुले यामुळे होणारे प्रदुषण रोखण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मंदिरातील निर्माल्याची विल्हेवाट कशी लावता येईल, यावर काम सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख मंदिर संस्थानांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मंदिर परिसरात निर्माण होणारे निर्माल्य, फुले आणि पूजाविधीनंतर जमा होणाऱ्या इतर साहित्याचे योग्य संकलन आणि प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मंदिर संस्थानांच्या सहभागातून निर्माल्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे, गोदावरी नदीचे संवर्धन करणे आणि सिंहस्थापूर्वी कायमस्वरूपी स्वच्छता व्यवस्था निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापनही तितक्याच आदराने आणि जबाबदारीने होणे आवश्यक आहे. मंदिर संस्थान, नागरिक आणि विविध घटकांच्या सहभागातून गोदावरी संवर्धनाबरोबर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी दीर्घकालीन उपयोगी ठरणारे शाश्वत प्रारुप विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

मंदिर स्तरावरील निर्माल्य संकलन व्यवस्था, आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि निर्माल्यावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांबरोबर समन्वय याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. निर्माल्य व्यवस्थापनाबरोबरच ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवरही भर दिला जाणार आहे. संकलित निर्माल्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची शक्यता तपासली जाणार असून, या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचाही प्रयत्न राहणार आहे. मंदिर संस्थानांचे मार्गदर्शन आणि सहभागातून निर्माल्य व्यवस्थापनाचे प्रभावी आणि अनुकरणीय प्रारुप उभारण्याचा प्रयत्न असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने निर्माल्याचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये वाहिली जाणारी फुले, पाने यांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यासंदर्भात मंदिर संस्थानांचे विश्वस्त, प्रतिनिधींचे मत जाणून घेण्यात येणार आहे.