नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदाकाठावर एकविसाव्या शतकातील तिसऱ्या सिंहस्थ कुंभ पर्वाला शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आदींसह साधू, महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. हिंदू धर्मियांच्या अस्मितेशी जोडलेल्या कुंभमेळ्याशी सत्ताधीशांचे पूर्वापार नाते राहिले आहे. या सोहळ्यात सुविधा पुरविणे असो वा प्रत्यक्ष सहभागी होणे असो, राजकीय मंडळींचे कुंभमेळ्याशी नाते प्रत्येकवेळी अधिकाधिक घट्ट होत आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यंदाच्या कुंभमेळ्यातही पुन्हा एकत्र आल्याचे दिसणार आहे.
यंदाच्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे महिला राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण झाले. आजवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्यापासून ते तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, भाजप नेते प्रमोद महाजन, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल, केंद्र आणि राज्यातील अनेक तत्कालीन मंत्री यांच्यापर्यंत अनेकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. आजपर्यंत सहा कुंभमेळ्यांच्या नियोजनात सक्रिय सहभागी राहिलेले गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी या मंडळींना अपेक्षित पूजा-अर्चा रामकुंडावर केली आहे.
केंद्र सरकारकडून कुंभमेळ्याला निधी देण्याची सुरूवात अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना झाली. त्यांनी २००३-०४ च्या कुंभासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. मागील म्हणजे २०१५ मधील कुंभात तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ध्वजारोहण झाले होते. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभात सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून सहभागी होणारे फडणवीस हे महाराष्ट्रातील एकमेव मुख्यमंत्री ठरतील. मागील कुंभमेळ्यावेळी अमित शाह यांच्याकडे केंद्रात मंत्रिपद नव्हते. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. कुंभकाळात शाह सहकुटुंब नाशिक येथे आले होते. शाह कुटुंबियांनी तेव्हा गोदावरीचे पूजन आणि मार्जन स्नान (मंत्रोच्चारात अंगावर पाणी शिंपडणे) केल्याची आठवण शुक्ल यांनी सांगितली. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री असताना कुंभमेळा नियोजनात सहभागी राहिले. परंतु, कधी कुंभमेळ्यासाठी आले नाहीत. त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून तत्कालीन मंत्री रामराव आदिक यांना पाठवले होते.
हिंदू धर्मियांच्या सोहळ्यात आजवरच्या बहुसंख्य सत्ताधाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग व योगदान राहिले. या कुंभमेळ्यातील कामांवर केंद्र आणि राज्य सरकारकडून ३५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होत आहे.
गिरीश महाजन दुसऱ्यांदा कुंभमेळा मंत्री
कुंभमेळ्याचे स्वरुप इतके विशाल झाले की, महाराष्ट्र सरकारला ‘कुंभमेळा मंत्री’ म्हणून विशेष जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली. सलग दुसऱ्या कुंभमेळ्यात ही जबाबदारी महाजन हे सांभाळत आहेत. मागील कुंभमेळ्याचा अनुभव असल्याने महायुती सरकारमध्ये या पदासाठी त्यांच्याशी कोणी स्पर्धा करू शकले नाही.
सनातन हिंदू वैदीक धर्म असून कुंभात राजकीय मंडळी उत्स्फुर्तपणे सहभागी होणे ही चांगली बाब आहे. याकडे कोणी कुठल्या चष्म्यातून पहावे, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. – सतीश शुक्ल (माजी अध्यक्ष, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक)
