नाशिक – नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत त्र्यंबकेश्वर येथे दुसऱ्या टप्प्यातील दर्शन पथ आणि घाट, कुशावर्त कुंड जतन व संवर्धन, नाशिकमध्ये टाकळी येथे नवीन घाट बांधणी अशा पायाभूत सुविधांच्या सुमारे ६०० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये शिर्डी येथील रस्त्यांचे रुंदीकरण व वाहनतळ तसेच शिर्डी-संगमनेर जोड रस्त्यांच्या कामांचाही अंतर्भाव आहे.

विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तिजोरीचे दरवाजे उघडले असून केवळ नाशिकच नव्हे तर शिर्डी आणि संगमनेरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे.

विषय पत्रिकेत समाविष्ट विद्युत पुरवठा बळकटीकरण, गोदावरी-नंदिनी संगमावर रबर अर्थात बलून बंधारा बांधणे आदी विषयांवर चर्चा झाली. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या दुसऱ्या टप्प्यातील ३९० कोटींच्या विकास कामांना संयुक्त प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यामध्ये दर्शन पथ व घाटांचा विकास, शाही मार्गाचा पुनर्विकास व सौंदर्यीकरण, विधी भवन व संबंधित धार्मिक सुविधांची उभारणी, शिवसृष्टीसह उद्यान व सार्वजनिक जागांचा विकास तसेच विक्रेत्यांसाठी नियोजित सुविधा उभारण्याचा समावेश आहे. गोदावरी–नंदिनी संगमाजवळ टाकळी येथे नवीन घाटाच्या बांधकामास ७२.१६ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून घाटाची लांबी सुमारे ४०० मीटरपर्यंत वाढणार आहे.

कुंभमेळा काळात देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये येतील. धार्मिक पर्यटनाला आलेले भाविक आसपासच्या धार्मिक स्थळांना भेटी देतील. हे लक्षात घेऊन प्राधिकरणाने तयारी चालविली आहे. नाशिक ते शिर्डी साधारणत ९० किलोमीटरचे अंतर आहे. कुंभमेळ्यात शिर्डीत भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्याची तयारी केली जात आहे. त्या अनुषंगाने साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. या परिसरात भाविकांना थांबण्यासाठी मोकळी जागा, भाविक ने-आण व्यवस्था, वाहनतळ विकसित केले जातील. भाविकांना सुरक्षित दर्शन व्यवस्था व आपत्कालीन गर्दीचे नियोजन केले जाईल. यासाठी सुमारे २५ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. शिर्डी नगरपरिषदेमार्फत रस्ते व वाहनतळाची कामे केली जाणार आहेत. कुंभमेळा तीर्थयात्रा परिसरातील महत्त्वाचा धार्मिक केंद्रबिंदू म्हणून शिर्डी येथे कुंभमेळा वारसा दर्शविणारी स्वागत कमान उभारण्यात येणार आहे.

रस्त्यांसाठी ९७ कोटी

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शिर्डी-संगमनेर जोड रस्त्यांचे रुप पालटणार आहे. ९७ कोटींहून अधिकच्या कामांना प्राधिकरणाने मान्यता दिली. यात निळवंडे-कौठे कमळेश्वर रस्ता, संगमनेर-वडगावपान रस्ता आणि वडगावपान-निळवंडे रस्ता या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत. बैठकीस कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आदी उपस्थित होते. मंजूर कामांची वेळेत अंमलबजावणी, विभागांमधील समन्वय आणि सातत्यपूर्ण देखरेख अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्राधिकरणाचे प्रमुख डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले.