नाशिक: कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे चाललेल्या तयारीवर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने पाणी फेरले. रस्ते, कुशावर्त तीर्थ व तलाव सुशोभिकरण आदी कामांना पावसाचा फटका बसला. साधुग्रामसाठी निश्चित केलेली जागा जलमय, चिखमलय झाली. पावसाळ्यात होणाऱ्या कुंभमेळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आता त्र्यंबकेश्वरमध्ये साधुग्रामची जागा बदलण्याची तयारी सुरू झाली. त्याकरिता प्रशासकीय यंत्रणांकडून अल्पावधीत उंचावरील सुरक्षित पर्यायी जागा शोधण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा हा नाशिकच्या सोहळ्याचा अत्यंत महत्वाचा आणि मुख्य धार्मिक गाभा मानला जातो. नाशिकमध्ये वैष्णव पंथाचे साधू-महंत स्नान करतात. तर त्र्यंबकेश्वर येथे शैव पंथाचे आणि दशनामी आखाडे एकत्र येतात. २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाच्यावतीने पायाभूत सुविधांची अनेक कामे हाती घेतली आहेत.

अंतर्गत रस्ते, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे विस्तारीकरण, नवीन घाट बांधणी, मंदिरांचे सुशोभिकरण आदी कामे प्रगतीपथावर आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थ आणि अन्य तलावाचे सुशोभिकरण केले जात आहे. विविध आखाड्यांमध्ये पाणी, सभागृह, स्वच्छतागृहाची आदी सुविधा केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाची झळ या कामांना बसली.

सुशोभिकरणासाठी बसवलेल्या फरशा वाहून गेल्या. देशभरातून येणाऱ्या साधु-महंतांच्या निवासासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये साधूग्रामची उभारणी होणार आहे. या ठिकाणी साधूंसाठी निवास व्यवस्था, तात्पुरते वीज, पाणी पुरवठा आणि स्वच्छतागृहाची सोय केली जाणार आहे. साधुग्रामसाठी प्रयागराज तीर्थ येथील मोकळी जागा निश्चित करण्यात आली होती. मुसळधार पावसात या परिसरातच पाणी साचले. संपूर्ण भाग चिखलमय झाला. पुढील वर्षी कुंभमेळा पावसाळ्यातच होणार आहे. साधुग्रामसाठी ही जागा कायम ठेवली तर कुंभमेळ्यात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे साधुग्रामची जागा बदलण्याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरले. साधुग्रामसाठी त्र्यंबकेश्वर परिसरात नव्या जागेचा शोध घेण्यात आला.

कोलंबिका देवस्थानची जागा निश्चित

कुंभमेळा प्राधिकरणच्यावतीने या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी त्यास दुजोरा दिला. त्र्यंबकेश्वर परिसरातील पिंपळद-नाशिक रस्त्यावर साधुग्राम होणार होते. मात्र पावसाळ्यात तिथे पाणी साचले. यामुळे आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागील बाजुला असलेल्या नाथपंथीय मंदिराच्या पुढे कोलंबिका देवस्थानच्या २५० हून अधिक एकर जागेवर साधुग्राम तयार करण्याचे निश्चित करण्यात येत आहे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तसेच संबंधित आस्थापनाकडून भौगोलिक सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. हा भाग जरासा उंच असल्याने ही जागा साधुग्रामसाठी निवडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.