नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराविरोधात नाराजीची धग कायम असतानाच तालुका पशुवैद्यकीय दवाखाना स्थलांतराचा मुद्दाही पुढे आला आहे. हा दवाखाना दर्शन पथाच्या कामासाठी जमीनदोस्त केला जाणार आहे. मात्र, अद्याप त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडून पर्यायी जागा किंवा अन्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने हा दवाखाना त्र्यंबकेश्वरपासून सात किलोमीटरवरील अंजनेरी येथे स्थलांतरित करण्याची वेळ पशुवैद्यकीय विभागावर आली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरापासून हाकेच्या अंतरावर हा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबक-तळेगाव, सापगाव, पेगलवाडी, कार्चोली, पिंपळद यांसह अन्य गावांमधील गुरे, प्राणी दवाखान्यात आणले जातात. दवाखाना रिक्त करण्याबाबत दोन वेळा पत्र प्राप्त झाले आहे. एकदा दवाखाना पाडण्यासाठी जेसीबी आवारात आणण्यात आला होता. मात्र, दवाखान्यासाठी पर्यायी जागा मिळालेली नसल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केल्यानंतर जेसीबी माघारी पाठवण्यात आला. त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने सध्या काही साहित्य अंजनेरी परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाबरोबरच पशुवैद्यकीय दवाखानाही श्रावण महिना संपल्यानंतर पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गावात जागा मिळेनाशी
पशुवैद्यकीय विभागाकडून सध्या पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडे गावातच जागा किंवा अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मेहेरे यांनी सांगितले. मात्र, नगरपालिकेने अद्याप कोणतीही व्यवस्था केलेली नाही. दुसरीकडे, कुंभमेळा प्राधिकरणाकडून जागा दाखवा, त्या ठिकाणी इमारत बांधून देतो, असे सांगण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी, गावात पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यासाठी जागा नसल्याचे नमूद केले.
शेतकर्यांना आर्थिक भुर्दंडाची शक्यता
दवाखाना स्थलांतरित झाल्यास परिसरातील शेतकर्यांसह पशुधनाचा सांभाळ करणार्यांना पदरमोड करून जनावरांना अंजनेरी येथे न्यावे लागणार आहे. त्यामुळे वेळ आणि खर्च वाढण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत पशुधनाच्या उपचाराचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.
