नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसरात होत असलेल्या कामांमध्ये जलशुध्दीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वरचे केंद्रस्थान असलेल्या कुशावर्त तीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. हे काम ३१ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल, असा दावा नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

श्राध्द विधीसाठी महत्वाचे ठिकाण जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर नगरीत पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभ पर्वास ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाने सुरूवात होणार आहे. या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर नगरीत विविध कामे करण्यात येत आहेत. घाट बांधनी, जलवाहिन्या टाकणे, रस्त्याची दुरूस्ती यासह इतर कामांनी वेग घेतला आहे. या कामातंर्गत कुशावर्त परिसरात पुरातत्वसह अन्य विभागाकडून खोदकाम सुरू आहे. कुशावर्त परिसरातील पायऱ्यांजवळील थर मोकळा करण्यात आला, नगरपालिकेच्या वतीने संबंधित परिसरातील स्वच्छतागृह पाडण्यात आले. त्या ठिकाणी जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे.

वेगवेगळ्या आस्थापनांकडून सुरू असलेल्या कामामुळे सध्या कुशावर्त परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकामे होत आहेत. बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांना या कामांविषयी फारशी नसल्याने त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नगरपरिषदेच्या वतीने जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम रखडले आहे. यामुळे कुशावर्त कुंडात प्रदुषित पाणी येत आहे. दुसरीकडे कुशावर्ताच्या बाजुला जलशुध्दीकरणासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असल्याने शेजारची गल्ली तसेच अन्य ठिकाणी ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमुळे पितृपक्षातील विधी करायचे कुठे, असा प्रश्न पुरोहितांसमोर आहे.

दरम्यान, या भागात असलेले पूजेचे सामान, कापड दुकाने, खाद्य पदार्थाची दुकाने खोदकामांमुळे बंद ठेवावी लागत असल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासन मात्र ही कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा करत आहे.

कुशावर्त परिसरात गैरसोयींचा सामना

कुशावर्त परिसरात पाडकामात स्वच्छतागृह पाडण्यात आले. कुशावर्त परिसरात विधीसाठी येणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विधीसाठी अडचणी येत आहे. तसेच महिलांना वस्त्र बदलण्यासाठी या ठिकाणी आडोसा नाही. खड्डे आेलांडत कुशावर्त गाठतांना वृध्द व्यक्तींना अडचणी येत आहे.

कुशावर्त कुंडातील काही काम बाकी

कुशावर्त येथील जलशुध्दीकरण प्रकल्प तसेच जलवाहिन्या टाकण्याचे काम ३१ ऑक्टोबर अर्थात ध्वजारोहणापूर्वी पूर्ण होणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून १० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम आणि पंप हाऊस हे काम बाकी आहे. कुंडातील काही काम बाकी आहे. ही सर्व कामे ३१ ऑक्टोबर आधी पूर्ण होतील.– गोविंद जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी, त्र्यंबकेश्वर नगरपालिका)